आळंदी: आळंदी शहरात गेल्या काही महिन्यांपासून अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रोटेशननुसार केवळ चार ते पाच दिवसांनी दीड तास पाणीपुरवठा होत असल्याने गावठाण आणि खेड विभागातील नागरिकांना घरगुती वापरासाठीही पाण्याची कमतरता भासत आहे. पाइपलाइन दुरुस्तीमुळे बुधवारी पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता, परंतु त्यानंतर काही भागात आठ दिवसांनी पाणी मिळाल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आळंदीकरांनी खेडचे आमदार बाबाजी काळे यांची भेट घेऊन तक्रार नोंदवली.
नागरिकांनी मार्च 2024 चे पाणीपुरवठा वेळापत्रक आणि टप्पे आमदारांना दाखवत, पूर्वीच्या नियोजित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. नवीन टप्पे वाढवल्याने पाणी वितरण विस्कळीत झाल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत आमदार काळे यांनी मुख्याधिकाऱ्यांशी मोबाइलद्वारे संवाद साधला आणि नागरिकांशी चर्चा करून मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या. तसेच, शहरातील टँकर व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला.
आळंदीतील संदीप नाईकरे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना बदलण्याची मागणी आमदारांकडे केली. यावेळी योगीराज सातपुते, आशिष गोगावले आणि अभिजित डफळ उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वीही आमदारांनी मुख्याधिकाऱ्यांना पाणी वितरण पूर्वीच्या पद्धतीनुसार करण्याचे निर्देश दिले होते, परंतु नवीन टप्प्यांमुळे व्यवस्था कोलमडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांचा असंतोष स्पष्टपणे दिसून येत आहे.
आमदार बाबाजी काळे यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. नागरिकांनीही प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.