Wednesday

30-07-2025 Vol 19

श्रीज्ञानेश्वरीद्वारे विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणासह संस्कारांचे धडे; आळंदीत ९ जूनला शिक्षक कार्यशाळा

आळंदी वार्ता: श्रीज्ञानदेवांच्या साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण आणि संस्कारांचे धडे देण्याच्या उदात्त हेतूने पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ओळख श्रीज्ञानेश्वरी परिवाराने उल्लेखनीय यश मिळवले आहे. श्रीज्ञानेश्वर शिक्षण संस्था, आळंदी देवाची येथे सुरू झालेल्या या उपक्रमाने आता पंचक्रोशी, पुणे जिल्हा आणि जळगावपर्यंत ९० शाळांमध्ये आपले पाय रोवले आहेत. येत्या सोमवारी, ९ जून रोजी श्रीज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी देवाची येथे शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आज शनिवारी (दि. 7) पुणे पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पत्रकार परिषदेत ज्ञानेश्वर चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश देवराम काळे, श्रीज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, आळंदी पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुनराव मेदनकर यांनी उपस्थितांना या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, श्रीमाऊलींच्या कृपाप्रसादाने हा उपक्रम सुरु झाला. डॉ. सुभाष महाराज गेठे, भागवत महाराज साळुंखे, वासुदेव शेवाळे, उमेश बागडे यांनी विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यास सुरुवात केली. २०२० मध्ये हा उपक्रम सुरू झाला. श्रीज्ञानेश्वर विद्यालयाच्या सहकार्याने येथील इयत्ता ४ थी, ५ वी, ६ वी साठी श्रीहरिपाठ आणि इयत्ता ८ वी साठी श्रीज्ञानेश्वरीमधील मूल्यशिक्षण शिकवण्यास सुरुवात झाली.

माऊली संस्थानचा पाठिंबा:

माऊली संस्थानचे तत्कालीन विश्वस्त योगेश देसाई, ह.भ.प. अभय टिळक, अॅड. विकास ढगे आणि व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी या उपक्रमासाठी सर्व आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. श्रीक्षेत्र आळंदीतील ४० ते ५० महाराजांनी स्वत: पुढाकार घेऊन जबाबदारी स्वीकारली. परिणामी, हा उपक्रम पंचक्रोशी, पुणे जिल्हा आणि जळगावपर्यंत ९० शाळांमध्ये पोहोचला. श्रीमाऊली संस्थानने ज्ञानेश्वरीमधील मूल्यशिक्षण व संस्कारांचे धडे या पुस्तकाची निर्मिती केली, ज्याचे प्रकाशन भाषा आणि सांस्कृतिक मंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते झाले.

संस्थानच्या नव्या विश्वस्तांचा पुढाकार:

श्रीज्ञानेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा, अॅड. रोहिणी पवार आणि पुरुषोत्तमदादा महाराज पाटील यांनी या उपक्रमाला नवसंजीवनी दिली. डॉ. गेठे, साळुंखे आणि शेवाळे यांच्या लेखणीमधून ओळख श्रीज्ञानेश्वरी हे पुस्तक साकारले, तर माजी विश्वस्त अभय टिळक यांनी शिक्षकांसाठी स्वतंत्र पुस्तक लिहिले.

अभ्यासक्रम आणि व्यवस्थापन:

हा उपक्रम शाळांच्या नियमित शैक्षणिक वेळापत्रकात समाविष्ट करण्यात आला आहे. इयत्ता ५ वी, ६ वी साठी हरिपाठ पाठांतर, ७ वी साठी हरिपाठाचा अर्थ आणि ८ वी साठी मूल्यशिक्षण व संस्कार यांचा समावेश आहे. यासाठी शाळांना अतिरिक्त वेळ द्यावा लागत नाही. ऑफ-पिरियड तासांचा वापर करून शिक्षक गैरहजर असताना श्रीहरिपाठ आणि दर शनिवारी आनंददायी ओळख श्रीज्ञानेश्वरी हा उपक्रम राबवला जातो. अनेक शाळांनी स्वत:च्या शिक्षकांमार्फत हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे.

शिक्षक कार्यशाळा:

या उपक्रमाला अधिक गती देण्यासाठी श्रीमाऊली संस्थानने ९ जून रोजी श्रीज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी देवाची येथे शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत श्रीज्ञानेश्वरीमधील प्रगल्भ ज्ञान, माऊलींचे विचार, समाजशास्त्र, नागरिकशास्त्र यांचा समावेश असलेले मूल्यशिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचवावे, याचे मार्गदर्शन केले जाईल. कार्यशाळेत अभ्यास, श्रवण, संभाषण आणि आई-वडील, गुरुजनांविषयी माऊलींचे विचार यांवर विशेष भर दिला जाणार आहे.

दरम्यान, हा उपक्रम जून २०२५ पासून पैठण, नाशिक आणि नेवासा येथून सुरू व्हावा, अशी मागणी शालेय संस्थांकडून होत आहे. ओळख श्रीज्ञानेश्वरी परिवार श्रीज्ञानेश्वरीमधील ज्ञान आणि विज्ञान यांचा संगम विद्यार्थ्यांना समाजशास्त्र आणि नागरिकशास्त्रासह मूल्यशिक्षणाच्या माध्यमातून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

alandivarta