आळंदी वार्ता: भारतीय जनता पक्षाच्या आळंदी शहर मंडल अध्यक्षपदाची बहुप्रतीक्षित नियुक्ती अखेर जाहीर झाली असून, आळंदी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांची या पदावर निवड झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
नियुक्ती सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार राहुल कुल, राजेश पांडे, शरद बुट्टे पाटील, प्रदीप कंद, संजय घुंडरे, अशोक उमरगेकर, राम गावडे, किरण येळवंडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
भाजपाच्या नवीन पक्षसंघटना बांधणी धोरणानुसार मंडल अध्यक्षपदाची निर्मिती करण्यात आली आहे. साधारणपणे १०० बूथ मिळून एक मंडल अशी रचना असून, याच अनुषंगाने वैजयंता उमरगेकर यांची आळंदी शहर मंडल अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची माहिती भाजपा नेते संजय घुंडरे यांनी दिली.
आगामी आळंदी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेची मजबूत बांधणी करत सर्वांना सोबत घेऊन निवडणुकीत यश मिळवण्याचा निर्धार उमरगेकर यांनी व्यक्त केला. “वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची धोरणे आणि जनसामान्यांसाठीच्या कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम करण्यासाठी पक्षपातळीवर सातत्याने प्रयत्न करणार,” असे त्यांनी सांगितले.
वैजयंता उमरगेकर यांच्या नियुक्तीमुळे आळंदीतील भाजपाच्या कार्याला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.