आळंदी वार्ता: आळंदी येथील नगरपालिका चौकात पालिकेने निर्माण केलेल्या शिवसृष्टी परिसरातील बागेतील झाडांना मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या नुकसानाबाबत आज सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओने नागरिकांचे लक्ष वेधले. या व्हिडिओत शेळ्या स्टीलच्या अँगल्समधून आणि त्यावर चढून बागेतील छोट्या झाडांची पाने आणि फांद्या खात असल्याचे दिसून आले. यामुळे झाडांचे संवर्धन व्हावे आणि मोकाट जनावरांपासून त्यांचे संरक्षण व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती.
या घटनेची तत्काळ दखल घेत आळंदी नगरपालिकेने त्वरित उपाययोजना सुरू केल्या आहेत. शिवसृष्टी समोरील बागेतील स्टीलच्या अँगल्सना जाळी बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे मोकाट जनावरांचा बागेतील झाडांना होणारा त्रास टाळता येणार आहे. पालिकेच्या या तत्परतेचे नागरिकांकडून स्वागत होत असून, बागेच्या सौंदर्याचे आणि पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नगरपालिकेने यापुढेही बागेच्या देखभालीसाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आश्वासन दिले आहे. नागरिकांनी देखील मोकाट जनावरे रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.