आळंदी वार्ता – आळंदी नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक १ ते ४ मधील १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या २४ शिक्षकांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाच्या ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयानुसार, सेवाज्येष्ठतेनुसार बदल्या करण्याचे निर्देश असून, यानुसार ही प्रक्रिया पार पडली. मुख्याधिकारी तथा प्रशासक माधव खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जून २०२५ रोजी झालेल्या बैठकीत या बदल्या पारदर्शकपणे चिठ्ठ्या काढून आणि विषयानुसार रिक्त जागांवर नियुक्त्या करून पूर्ण करण्यात आल्या.
प्रशासन अधिकारी, नगरपरिषद शिक्षण मंडळ यांनी १० जून २०२५ रोजी बदलीपात्र शिक्षकांची यादी सेवाज्येष्ठतेनुसार प्रसिद्ध केली होती. यात उपशिक्षक आणि उपशिक्षिकांसह पदवीधर शिक्षकांचा समावेश आहे. उपशिक्षकांमध्ये अंकुश बहिरट (शाळा क्र. ३), रहीम तांबोळी (शाळा क्र. २), सोनाली भायनाक (शाळा क्र. ४), नागनाथ कुंभार (शाळा क्र. १), मोहिनी साठे (शाळा क्र. २) यांच्यासह १० जणांचा समावेश आहे. पदवीधर शिक्षकांमध्ये वैशाली तोत्रे (शाळा क्र. ४), मारुती आढळ (शाळा क्र. ३), सुवर्णा तरटे (शाळा क्र. ३), रेश्मा गोवेकर (शाळा क्र. १), मंजूषा आल्हाट (शाळा क्र. १) यांच्यासह १४ शिक्षकांचा समावेश आहे.
बदलीप्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आली असून, सर्व शिक्षकांना नव्या शाळांमध्ये रुजू होण्याच्या सूचना मुख्याधिकारी खांडेकर यांनी दिल्या आहेत. यासाठी स्वतंत्र आदेश तयार करण्याचे निर्देश प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या बदल्यांमुळे शैक्षणिक व्यवस्थेत सुसूत्रता येण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.