आळंदी वार्ता: श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आणि पत्रकार संघ, आळंदी देवाची यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या उपक्रमांतर्गत शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन सोमवार, दि. ९ जून २०२५ रोजी श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, आळंदी देवाची येथे होणार आहे. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत दोन सत्रांमध्ये हा कार्यक्रम होईल.
पहिले सत्र:
सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पहिले सत्र होईल. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ह.भ.प. योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ (प्रमुख विश्वस्त, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी) भूषवतील. उद्घाटक म्हणून डॉ. सदानंद मोरे (संत साहित्याचे गाढे अभ्यासक, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ, महाराष्ट्र शासन) उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र उमाप (विश्वस्त, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी), डॉ. अभय टिळक (प्रसिद्ध अर्थतज्ञ, माजी विश्वस्त, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी), ह.भ.प. चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा (विश्वस्त, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी) आणि डॉ. प्रा. ह.भ.प. सुभाष महाराज गेठे (अध्यक्ष, जनकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठाण, आळंदी) उपस्थित राहतील.
दुसरे सत्र:
दुपारी २ ते ४ या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष डॉ. भावार्थ देखणे (विश्वस्त तसेच पालखी सोहळा प्रमुख, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी) असतील. यावेळी वेदांताचार्य ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव (वेदांत सत्संग समिती, आळंदी), अॅड. डॉ. रोहीणी पवार (विश्वस्त, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी), डॉ. श्री. भाऊसाहेब कारेकर (शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे जिल्हा परिषद), सम्राट फडणीस (संपादक, दैनिक सकाळ), ह.भ.प. पुरुषोत्तम दादा महाराज पाटील (विश्वस्त, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी) आणि डॉ. सुरेंद्र हेरकळ (प्राचार्य, गोखले शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय, परेल, मुंबई) यांचे मार्गदर्शन लाभेल. प्रश्नोत्तरे आणि शंका-समाधान होईल. सत्राचा समारोप पसायदानाने होईल.
उद्दिष्ट आणि महत्त्व-
या प्रशिक्षण वर्गातून शिक्षकांना श्री ज्ञानेश्वरीच्या तात्त्विक आणि सांस्कृतिक महत्त्वाची ओळख करून देणे आणि त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचविणे हा उद्देश आहे. आळंदीच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाला उजाळा देणारा हा उपक्रम शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संत ज्ञानेश्वरांचे विचार पेरण्यास साहाय्यभूत ठरेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.