Monday

28-07-2025 Vol 19

पंढरपूरची वारी आणि वारकऱ्यांचा मोक्षमार्ग: अभंग चिंतन

पंढरीचे वारकरी | तें अधिकारी मोक्षाचे ||१||
पुंडलिका दिला वर | करुणाकरें विठ्ठलें ||२||
मूढ पापी जैसें तैसें | उतरी कासें लावूनि ||३||
तुका म्हणे खरे झालें | एका बोलें संतांच्या ||४||

अर्थ – चिंतनसाठी निवडलेला हा अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे. या अभंगामधून आपणास असे दिसते की, संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज वारकरी संप्रदायातील
पंढरीच्या वारकऱ्यांचे महत्त्व सांगतात. पंढरीची वारी आणि वारकरी यांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. “पंढरी पंढरी म्हणता | पापाची बोहरी ||” मुखाने आपण पुन्हा पुन्हा नुसते पंढरी पंढरी म्हटले तरी आपल्या पापाची भोवरी म्हणजे होळी होते, आपले पाप नष्ट होते. वारकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे पाप शिल्लक राहत नाही. ते पुण्यवान होतात, आसा वारीचा महिमा आहे.

जेव्हा विश्वामध्ये चराचर नव्हते तेव्हा पंढरपूर होते. जेव्हा भूतालावर गोदावरी, गंगा नव्हत्या तेव्हा चंद्रभागा होती. हे जंबू दीपामध्ये असणारे एक पंढरपूर नावाचं गाव आहे. हे भीमा नदीच्या तीरावर वसलेले नगर आहे. त्या पंढरपुराला, त्या पवित्र तीर्थक्षेत्राला नाचत, गायन करीत जावे असे महाराजांना वाटते. स्वतः पांडुरंग परमात्म्यांनी, विठ्ठलानीही भक्ताला, वारकऱ्यांना सांगितले आहे की आषाढी- कार्तिकी वारीला मला विसरू नका. एकनिष्ठ श्रद्धेने, भावनेने, मनाने फक्त पंढरपूरची वारी करणारे विठ्ठलाचे भक्त हे खरे वारकरी असतात.

वारी म्हणजे एखाद्या देवतेला, एखाद्या तीर्थक्षेत्राला, दैवताला, पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जाणे – येणे ठराविक कालावधीनंतर याला वारी असे म्हणतात. वारी ही नेमाने करायची असते, न चुकता, न ढळता, नेम न सोडता, एक निष्ठेने करायचे असते. एकनिष्ठ पंढरपूरचा वारकरी इतर कोणत्याही देवतेच्या दर्शनाला रस्त्याने, पायी वारी करताना दर्शनाला जात नाही. त्याचं मन तिकडे आकर्षित होत नाही. त्याचा मोह त्याला पडत नाही. त्याची एक निष्ठा पांडुरंगाबद्दल असते. असा षडविकारावर मात करणारा तो वारकरी होय.

आपल्या पायाने पायी पंढरपूर पर्यंत चालत जाणारा, वारी करणारा तो वारकरी होय. मानवी जीवनामध्ये जे अत्यंत महत्त्वाचे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ असतात. हा जो चौथा महत्त्वाचा जीवनातला पुरुषार्थ मोक्ष आहे. हे वारकरी आपल्या वाचीक, मानसिक व कायिक तपाने अधिकारी बनलेले असतात. तो मोक्ष त्यांना वारीच्या पुण्यामुळे प्राप्त झालेला असतो. वारकऱ्यांना मोक्ष मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या साधनेची गरज पडत नाही, वारीही केवळ एक साधना पुरेशी असते. त्यांना एकच पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास लागलेला असतो. भक्त पुंडलिकाची आपल्या आई-वडिलांची सेवा पाहून त्या ठिकाणी विठ्ठल प्रसन्न झाले आणि त्यांनी पुंडलिकाला एक वर दिलेला आहे. वर हा तप केल्यानंतर व सेवा तुम्ही केल्या नंतर मिळत असतो. विठ्ठलाने ही पुंडलिकावर केलेली करूणा, कृपा आहे. तो वर कोणता आहे, तर तुझ्या दर्शनाला, तुझ्या भेटीला, तुझ्या पंढरपूरला भक्त जे जे तुझ्या दर्शनाला येतील. ते मूर्ख असोत, विषयी असोत, पामर असोत, जिज्ञासू असोत. पापी, अति मूढ असोत. ते खट असोत. ते कसेही असले तरी तू त्यांचा उद्धार कर. त्यांना मोक्ष प्राप्त करून दे. त्यांची सर्व पाप नष्ट कर. त्यांना पुण्याची, मोक्षाची प्राप्ती करून दे.

तुकाराम महाराज म्हणतात, पुंडलिकासारख्या एका खऱ्या संतांमुळे हे सर्व पंढरीमध्ये शक्य होत आहे. त्यामुळे पंढरीचा हा सोहळा हे अनुपम आहे. त्या पांडुरंग परमात्म्याने पुंडलिकाला जो वर दिलेला आहे त्यामुळे सर्वच पंढरीमध्ये येणाऱ्या भक्ताला मोक्ष, समाधान, आनंद मिळतो. शांती, समाधान मिळते. कारण संतांच्या शब्दा पाठीमागे अर्थ धावत असतो. त्यामुळे पंढरपुरात कोणीही यावे आणि शुद्ध होऊनी जावे. यामध्ये संत पुंडलिकराय यांनी भगवंताकडे मागितलेले मागणे व भगवंताने त्याला दिलेला आशीर्वाद यामुळे पंढरीचे वारकरी हे नेहमी मोक्षाचे अधिकारी असतात. हा पंढरीच्या पायी वारीचा सोहळा आपण सर्वांनी अनुभवावा असाच आहे. त्यामुळे आपणास सर्वांनाही तो मोक्ष, हा चौथा पुरुषार्थ मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही वारकरी होण्याची, वारीला पायी चालत जाण्याची, वारीची फलश्रुती आहे. यात संशय घेण्याचं कोणतीही कारण नाही.

लेखक : श्री.ह.भ.प.प्रा.डॉ. पांडुरंग महाराज मिसाळ, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव (आळंदी), जि. पुणे.

alandivarta