Friday

01-08-2025 Vol 19

संत ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प: जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांचा निर्धार

आळंदी वार्ता: श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर जागतिक पातळीवर नेण्यासाठी आणि आळंदीला पंढरपूर, शिर्डी, शेगाव यांसारख्या प्रमुख देवस्थानांच्या यादीत स्थान मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा दृढ निश्चय पुणे जिल्हा न्यायाधीश तथा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे अध्यक्ष  महेंद्र के. महाजन यांनी व्यक्त केला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्म महोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला मंगळवारी (दि. 6मे) भेट देताना त्यांनी विश्वस्त मंडळ आणि आळंदीकर ग्रामस्थांच्या सहकार्याचे कौतुक केले.

आळंदीच्या विकासाचा संकल्प – 

आळंदी येथे सुरू असलेल्या भव्य हरिनाम सप्ताहात बोलताना महाजन म्हणाले, “आळंदीला पंढरपूर, शिर्डी, शेगाव यांसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या यादीत स्थान मिळवून देण्यासाठी अजूनही राहणीमान, भोजन, आणि अन्य सुखसुविधांची कमतरता आहे. यासाठी सहाही विश्वस्त आणि मी स्वतः शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करू. माऊलींचे मंदिर जागतिक पातळीवर नेण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने ठोस पावले उचलली जातील.” त्यांनी आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भाविकांच्या सोयींसाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.

सामाजिक समावेशकतेचा आदर्श –

महाजन यांनी आळंदीच्या विश्वस्त मंडळात दोन गावकऱ्यांचा समावेश करण्याच्या स्थानिकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ती पूर्ण केली. विशेष म्हणजे, संस्थानच्या इतिहासात प्रथमच एका महिलेची विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. ॲड. रोहिणी पवार यांच्या या नियुक्तीमुळे सामाजिक समावेशकतेचा नवा दृष्टिकोन अधोरेखित झाला आहे. “हा निर्णय आळंदी देवस्थानच्या विकासात सर्वांना सामावून घेण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे,” असे महाजन यांनी नमूद केले.

वैयक्तिक आठवणी आणि माऊलींची सेवा –

आपल्या भाषणात महाजन यांनी वैयक्तिक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “माझे आजोबा पंढरपूरची वारी करत असत. ते वारीवरून काळा गंडा आणि साखर फुटाणे आणत. तो गंडा हातात घालून, फुटाणे खाताना आम्हाला विठ्ठलाचे दर्शन व्हायचे. त्यांनी घेतलेल्या हरिनामाचे पुण्य मला मिळाले आणि आज माऊलींची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली.”

सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सवाचे यश –

संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७५० वा जन्मोत्सव एवढ्या भव्य प्रमाणात साजरा होत असल्याचे श्रेय महाजन यांनी विश्वस्त मंडळ आणि आळंदीकर ग्रामस्थांना दिले. “या महोत्सवाचे यश हे सर्वांच्या एकजुटीचे फलित आहे. विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ आणि वारकरी यांच्या सहकार्यामुळेच हा सोहळा अविस्मरणीय ठरत आहे,” असे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी कामगार राज्यमंत्री आकाश फुंडकर यांनी आळंदीच्या विकासासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ, ॲड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड. रोहिणी पवार, वारकरी शिक्षण संस्थेचे शांतीब्रह्म मारुती महाराज कुऱ्हेकर, कीर्तनकार ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले, आणि व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांसह हजारो भाविक उपस्थित उपस्थित होते.

आळंदी देवस्थानच्या विकासाला नवी दिशा –

महेंद्र महाजन यांच्या नेतृत्वाखाली आळंदी देवस्थानच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महिला विश्वस्ताची नियुक्ती, गावकऱ्यांचा विश्वस्त मंडळातील समावेश, आणि जागतिक पातळीवर मंदिराचा लौकिक वाढवण्याचा संकल्प यामुळे आळंदीच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर पडेल, असा विश्वास भाविकांनी व्यक्त केला. दरम्यान, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या या भव्य जन्म महोत्सवात आळंदीच्या तीर्थक्षेत्राला नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प झाला आहे. माऊलींचा समता, भक्ती आणि ज्ञानाचा वारसा पुढे नेण्यासाठी हा सोहळा एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

alandivarta