आळंदी वार्ता : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आणि आळंदी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मागील पाच वर्षांपासून राबवल्या जाणाऱ्या ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ उपक्रमांतर्गत शिक्षकांसाठी आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी “ज्ञानेश्वरी माणसाचे जीवन घडवते आणि वाचवते,” असे सांगत या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.
महाराष्ट्रातील ८८ शाळांमध्ये हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात असून, यातून मुलांमध्ये ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कार आणि आध्यात्मिक मूल्यांचा प्रसार होत आहे. कार्यशाळेत पुणे आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक शिक्षक-शिक्षिका सहभागी झाले. यावेळी वेदांताचार्य ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. चैतन्य महाराज लोंढे, माजी विश्वस्त अर्थतज्ज्ञ ह.भ.प. डॉ. अभय टिळक, जनकाई स्वाध्याय प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. सुभाष महाराज गेठे, पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, परेल येथील अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, राम मंदिराचे विश्वस्त अर्जुन मेदनकर, ज्ञानेश्वर विद्यालयाचे प्राचार्य एस. जी. मुंगसे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सदानंद मोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “ज्ञानेश्वरी हा वारकरी संप्रदायाचा आधारभूत ग्रंथ आहे. ती स्वतःची ओळख करून देते आणि समाजातील भांडणे मिटवण्याचे सामर्थ्य ठेवते. बांधिलकी जपून समाजाला शांतीचा संदेश दिला पाहिजे.” डॉ. अभय टिळक यांनी ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ पुस्तकातील ८ ते १६ धड्यांवर मार्गदर्शन करताना, शालेय जीवनात संस्कार रुजवून सुसंस्कृत पिढी घडवण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले.
डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी हा उपक्रम पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये राबवण्यासाठी शिक्षण विभागाकडून पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी ज्ञानेश्वरी केवळ पारायणासाठी नसून, तिचे ज्ञान जीवनात उतरवण्याचे महत्त्व विशद केले. सम्राट फडणीस यांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून या उपक्रमाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. ह.भ.प. सुभाष गेठे आणि डॉ. नारायण जाधव यांनी अनुक्रमे पहिल्या ८ आणि २४ ते ३२ धड्यांवर मार्गदर्शन केले, तर डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी १६ ते २४ धड्यांवर बोलताना अध्यात्म आणि विज्ञानाचा समन्वय साधण्याचे महत्त्व सांगितले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक अजित वडगावकर यांनी केले, सूत्रसंचालन गणेश लिखे यांनी केले, तर आभार तुकाराम गवारी यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. हा उपक्रम समाजात आध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांचा प्रसार करून नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
ओळख श्री ज्ञानेश्वरीविषयी –
श्रीज्ञानदेवांच्या साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण आणि संस्कारांचे धडे देण्याच्या उदात्त हेतूने पाच वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरु झाला. श्रीज्ञानेश्वर शिक्षण संस्था, आळंदी देवाची येथे सुरू झालेल्या या उपक्रमाने आता पंचक्रोशी, पुणे जिल्हा आणि जळगावपर्यंत ८८ शाळांमध्ये हा उपक्रम सुरु केला आहे. डॉ. सुभाष महाराज गेठे, भागवत महाराज साळुंखे, वासुदेव शेवाळे, उमेश बागडे यांनी विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यास सुरुवात केली. श्रीज्ञानेश्वर विद्यालयात इयत्ता ४ थी, ५ वी, ६ वी साठी श्रीहरिपाठ आणि इयत्ता ८ वी साठी श्रीज्ञानेश्वरीमधील मूल्यशिक्षण शिकवण्यास सुरुवात झाली.
माऊली संस्थानचा पाठिंबा:
माऊली संस्थानचे तत्कालीन विश्वस्त योगेश देसाई, ह.भ.प. अभय टिळक, अॅड. विकास ढगे आणि व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी या उपक्रमासाठी सर्व आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. श्रीक्षेत्र आळंदीतील ४० ते ५० महाराजांनी स्वत: पुढाकार घेऊन जबाबदारी स्वीकारली. श्रीमाऊली संस्थानने ज्ञानेश्वरीमधील मूल्यशिक्षण व संस्कारांचे धडे या पुस्तकाची निर्मिती केली, ज्याचे प्रकाशन भाषा आणि सांस्कृतिक मंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते झाले. श्रीज्ञानेश्वर संस्थानचे विद्यमान प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा, अॅड. रोहिणी पवार आणि पुरुषोत्तमदादा महाराज पाटील यांनी या उपक्रमाला नवसंजीवनी दिली. डॉ. गेठे, साळुंखे आणि शेवाळे यांच्या लेखणीमधून ओळख श्रीज्ञानेश्वरी हे पुस्तक साकारले, तर माजी विश्वस्त अभय टिळक यांनी शिक्षकांसाठी स्वतंत्र पुस्तक लिहिले.
हा उपक्रम शाळांच्या नियमित शैक्षणिक वेळापत्रकात समाविष्ट करण्यात आला आहे. इयत्ता ५ वी, ६ वी साठी हरिपाठ पाठांतर, ७ वी साठी हरिपाठाचा अर्थ आणि ८ वी साठी मूल्यशिक्षण व संस्कार यांचा समावेश आहे. यासाठी शाळांना अतिरिक्त वेळ द्यावा लागत नाही. ऑफ-पिरियड तासांचा वापर करून शिक्षक गैरहजर असताना श्रीहरिपाठ आणि दर शनिवारी आनंददायी ओळख श्रीज्ञानेश्वरी हा उपक्रम राबवला जातो. अनेक शाळांनी स्वत:च्या शिक्षकांमार्फत हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. याच उपक्रमाला अधिक गती देण्यासाठी शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले. या उपक्रमाला अनेकांचे सहकार्य लाभलेले आहे.