आळंदी वार्ता: श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथील शशिकलाबाई गणपतराव गायकवाड (वय ८५) यांचे शुक्रवार, २ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने गायकवाड कुटुंबीयांसह संपूर्ण आळंदीवर शोककळा पसरली आहे.
शशिकलाबाई या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजनसम्राट पं. कल्याणजी गणपतराव गायकवाड यांच्या मातोश्री, तसेच महाराष्ट्राची महागायिका कार्तिकी गायकवाड आणि कौस्तुभ गायकवाड यांच्या आजी होत्या. त्यांनी आपल्या मुलांना आणि नातवंडांना आदर्श विचार, शिक्षण आणि धार्मिक संस्कारांचे बाळकडू दिले. याच संस्कारांमुळे गायकवाड कुटुंबाने संगीत आणि गायन क्षेत्रात महाराष्ट्रात आळंदीचे नाव उज्ज्वल केले आहे.
शशिकलाबाई यांच्या पार्थिवावर पवित्र इंद्रायणी नदीकाठावरील अमरधाम स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, संगीत, व्यापार, कृषी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर, गायकवाड कुटुंबाचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि आळंदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शशिकलाबाई यांच्या पश्चात दोन मुले, सुना, सात मुली, जावई, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने आळंदीसह संगीत क्षेत्रात शोक व्यक्त होत आहे.