आळंदी वार्ता : श्री क्षेत्र आळंदी येथून पंढरपूरला निघणाऱ्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी आज पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले. दिनांक १९ जून ते ६ जुलै २०२५ या कालावधीत होणाऱ्या या वारीच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीत वाहतूक व्यवस्था, पार्किंग, गर्दीचे नियोजन, मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या बाबींची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी वारीदरम्यान सुरक्षितता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे नियोजन सज्ज असल्याचे सांगितले. तसेच, भाविकांच्या सोयी आणि सुरक्षेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-३) डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त (वाहतूक) बापु बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त (चाकण विभाग) राजेंद्रसिंग गौर, आळंदी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव नरके, पोलीस निरीक्षक आळंदी वाहतूक विभाग सतीश नांदुरकर उपस्थित होते. तसेच, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळ्याचे प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, ह.भ.प. चैतन्य महाराज लोंढे, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, अॅड. डॉ. रोहिणी पवार, संस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरात येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजनांवर चर्चा झाली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष मार्गांचे नियोजन, पार्किंग व्यवस्थेची सुविधा आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेची सतर्कता यावर भर देण्यात आला. या बैठकीमुळे आषाढी वारीच्या नियोजनाला गती मिळाली असून, भाविकांना सुरक्षित आणि सुव्यवस्थित वारीचा अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे.