आळंदी: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ, खेड तालुका यांच्या वतीने आळंदी येथे मंगळवारी (दि. 29)करण्यात आला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
संघाने हा हल्ला भारतावरील हल्ला असल्याचे म्हटले आहे. मृतांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, अशी प्रार्थना माऊलींच्या चरणी करण्यात आली.
हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाने आळंदी पोलीस स्टेशनला निवेदन सादर केले. यावेळी संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी निवेदन पोलिस उपनिरीक्षक तुकाराम खडके आणि पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे यांच्याकडे सुपूर्द केले.
आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन स्वीकारण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा प्रतिनिधी अमर गायकवाड, सचिव गौतम पाटोळे, सुहास सावंत, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सोमनाथ बेंडाले, अरुण कुरे, इम्रान हकीम आदी उपस्थित होते.
संघाने या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी केली आहे.