पुणे : आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या दगडी घाटाच्या तोडफोडीविरोधात शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो वारकऱ्यांनी शांततामय मार्गाने निषेध व्यक्त केला. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत बांधलेल्या या घाटाचे सांडपाणी वाहिनीच्या कामासाठी सुरू असलेले खोदकाम तात्काळ थांबवावे आणि घाट पूर्ववत करावा, या मागणीसाठी सदगुरू बाबाजी चैतन्य महाराज पालखी सोहळा आणि संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा पालखी सोहळ्याच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आले. उपजिल्हाधिकाऱ्यांनी ही मागणी वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना हभप धर्मराज महाराज हांडे, हभप महेश महाराज नलावडे, हभप शालीकराम महाराज खंदारे, हभप तुकाराम महाराज कापसे आणि हभप संतोष महाराज सांगळे यांच्यासह राज्यभरातील वारकरी उपस्थित होते. माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती आणि विश्वशांती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करोडो रुपये खर्चून इंद्रायणीच्या दोन्ही तीरांवर पर्यावरण सुधारणा आणि प्रदूषण नियंत्रणासाठी दगडी घाट बांधण्यात आले. डॉ. विश्वनाथ दा. कराड, वै. किसन महाराज साखरे, वै. पद्मश्री शंकर बापू आपेगावकर आणि वै. धुंडा महाराज देगलूरकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
या घाटावर सुंदर रेखीव आणि कोरीव काम, दर्शनबारी, गोमुखाद्वारे शुद्ध पाण्याची व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन आणि १४५ फूट उंच सुवर्णजडित गरूड स्तंभ यांसारखे अभिनव उपक्रम राबवले गेले. मात्र, सांडपाणी वाहिनीच्या कामामुळे घाटाची तोडफोड होत असल्याने वारकरी आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेकांनी पुण्यस्मरणार्थ आर्थिक योगदान देऊन घाटासाठी दगड लावले होते. सध्याच्या दुरवस्थेमुळे त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.
वारकऱ्यांनी भजन आणि कीर्तनाद्वारे शांततामय निषेध व्यक्त केला. यावेळी राज्यभरातील कीर्तनकार, प्रवचनकार आणि वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.