4000 हून अधिक सेवेकऱ्यांचा सहभाग, ह.भ.प. गणेश महाराज करंजकर यांचे मनमोहक कीर्तन; विविध यज्ञांनी सजला सोहळा
डुडुळगाव: अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास मार्ग बालसंस्कार केंद्र, डुडुळगाव (दिंडोरी प्रणित) येथे रविवार, 20 एप्रिल ते शनिवार, 26 एप्रिल 2025 या कालावधीत श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह आणि गुरुचरित्र पारायण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशाने, चंद्रकांत दादा यांच्या आशीर्वादाने आणि पुणे जिल्हा ऊर्जा स्रोत सतीश दादा मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
कीर्तन आणि भक्तीचा संगम –
सोहळ्याच्या सांगता दिवशी ह.भ.प. श्री गणेश महाराज करंजकर (झी टॉकीज स्वामी चरित्र कीर्तनकार) यांनी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाबद्दल माहिती देताना मनमोहक कीर्तन सादर केले. “वारकऱ्यासाठी जशी पंढरी, तशी स्वामी सेवेकऱ्यांसाठी दिंडोरी,” असे उदाहरण देत त्यांनी उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला. कीर्तन आणि महाप्रसादासाठी 4,000 हून अधिक सेवेकरी बंधू-भगिनी उपस्थित होते. डुडुळगावातील समस्त ग्रामस्थांनीही या कार्यात सक्रिय सहभाग घेतला.
सामुदायिक गुरुचरित्र पारायण आणि यज्ञ –
सप्ताहात सामुदायिक गुरुचरित्र पारायणासाठी 243 सेवेकरी सहभागी झाले. याशिवाय, गणेश याग, मनोबोध याग, चंडी याग, रुद्र याग आणि मल्हारी याग असे विविध यज्ञ विनामूल्य आयोजित करण्यात आले. या यज्ञांनी भक्ती आणि अध्यात्माची अनुभूती वाढवली. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, डुडुळगाव (दिंडोरी प्रणित) येथील हे उपक्रम भक्तांना आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रेरक ठरले. हा सप्ताह डुडुळगाव आणि परिसरातील भक्तांसाठी आध्यात्मिक उर्जेचा स्रोत ठरला.