Wednesday

30-07-2025 Vol 19

आळंदीत श्रीज्ञानेश्वरी पारायणाचा भव्य सोहळा

आळंदी वार्ता: श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सवानिमित्त तसेच ब्र. भू. दादा महाराज साखरे यांच्या ८५व्या पुण्यस्मरणानिमित्त श्रीक्षेत्र आळंदीतील साधकाश्रम येथे भव्य ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि माऊलींच्या चरित्र कथेचे निरूपण आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय युवा कीर्तनकार यशोधन महाराज साखरे यांनी दिली.

माऊलींच्या ७५०व्या जन्मोत्सवी वर्ष आणि दादा महाराजांचा समाधी महोत्सव यानिमित्त वैशाख वद्य पंचमी (१७ मे) ते वैशाख वद्य द्वादशी (२४ मे) या कालावधीत हा सोहळा साधकाश्रमात होत आहे. यात चार वेद, श्रीज्ञानेश्वरी, अमृतानुभव, अभंग गाथा, एकनाथी भागवत, दासबोध, समर्थ गाथा आदी ग्रंथांचे पारायण होत आहे. विशेष म्हणजे, गुरुवर्य चिदंबरेश्वरजी महाराज साखरे यांच्या मुखातून माऊलींच्या चरित्राचे भावनिरूपण होत आहे.

महाराष्ट्रभरातून २,०००हून अधिक भाविकांनी सहभाग घेतला असून, ३५० भाविकांनी श्रीज्ञानेश्वरीचे १०८ पारायण पूर्ण केले आहे. सकाळी ५ ते ६ काकडा भजन, ७ ते ११ श्रीज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ३ ते ५ चरित्र कथा, संध्याकाळी ६ ते ७ श्रीहरिपाठ आणि ७ ते ९ श्रीहरी कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम होत आहेत. वारकरी भाविकांनी उत्साही प्रतिसाद दिला असून, श्रीगुरु साखरे महाराज शिष्यपरिवाराच्या नियोजनामुळे हा सोहळा यशस्वी होत आहे.

alandivarta