Monday

28-07-2025 Vol 19

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२५: आळंदी ते पंढरपूर प्रवासाचे वेळापत्रक जाहीर… निरा स्नान, रिंगण सोहळे, मुक्कामांची सविस्तर माहिती पहा..

आळंदी – महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा यंदा (शके १९४७ सन २०२५) भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, हा पालखी सोहळा (ज्येष्ठ वद्य अष्टमी, गुरुवार, १९ जून २०२५) रोजी आळंदी येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल आणि आषाढ शुध्द दशमी (५ जुलै) शनिवारी पंढरपूरात पोहोचेल. ६ जुलैला आषाढी एकादशी आहे.

५ ते ९ जुलै पर्यंत पंढरपूर येथे मुक्काम असेल. १० रोजी पंढरपूर येथून परतीचा प्रवास सुरु होईल. त्यानंतर (आषाढ वद्य ११, सोमवार, २१ जुलै २०२५) रोजी पालखी परतीच्या प्रवासानंतर आळंदीत दाखल होईल.

पालखी सोहळ्याचा दिनक्रम आणि मार्ग –

या वर्षीचा पालखी सोहळा १९ जून रोजी आळंदीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरातून रात्री ८ वाजता प्रस्थान करेल. पहिला रात्रीचा मुक्काम आळंदीतील गांधी वाडा दर्शन मंडप इमारतीत होईल. पालखीचा प्रवास आळंदी ते पंढरपूर असा सुमारे २५० किलोमीटरचा आहे, ज्यामध्ये विविध ठिकाणी मुक्काम, विसावे आणि रिंगण सोहळे होणार आहेत. यंदा पुणे आणि सासवड येथे दोन दिवसांचा, तर लोणंद येथे दीड दिवसांचा मुक्काम ठरला आहे.

महत्त्वाचे टप्पे आणि रिंगण सोहळे –

२० जून २०२५, शुक्रवार: आळंदी येथून सकाळी पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होईल. थोरल्या पादुका आरती आणि भोसरी फाटा येथील विसाव्यानंतर पालखी फुलेनगर, संगमवाडी मार्गे भवानीपेठ, पुणे येथे रात्रीच्या मुक्कामासाठी पोहोचेल.

२१ जून २०२५, शनिवार: स्मार्त एकादशी पालखीचा मुक्काम पुण्यातच राहील.

२२ जून २०२५, रविवार: पुण्याहून पालखी शिंदे छत्री येथे आरती आणि हडपसर, वडकीनाला, झेंडेवाडी, पवारवाडी मार्गे सासवड येथे रात्रीच्या मुक्कामासाठी पोहोचेल.

२३ जून २०२५, सोमवार: सासवड येथेच मुक्काम असेल.

२४ जून २०२५, मंगळवार: सासवडहून पालखी निघेल. बोरावके मळा, यमाई शिवरी, साकुर्डे विसाव्यानंतर जेजुरी येथे पालखीचा मुक्काम असेल.

२५ जून २०२५, बुधवार: दौंडज शिव आणि दौंडज येथे विसावे होऊन पालखी वाल्हे येथे पोहोचेल.

२६ जून २०२५, गुरुवार: वाल्हे येथून पालखी पिंपरे खुर्द विहीर मार्गे नीरा येथे श्रींचे नीरा स्नान होईल. पुणे जिल्ह्याचा मुक्काम संपवून पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल. यानंतर पालखी लोणंद येथे रात्रीच्या मुक्कामासाठी पोहोचेल.

२७ जून २०२५, शुक्रवार: लोणंद येथून पुढे जाताना चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण होईल. यानंतर पालखी तरडगांव येथे मुक्काम करेल.

२८ जून २०२५, शनिवार: तरडगाव, दत्त मंदिर काळज, सुरवडी, निंभोरे ओढा, वडजल येथे विसाव्यानंतर पालखी मुक्कामासाठी फलटण येथे पोहोचले.

२९ जून २०२५, रविवार: फलटण, विडणी, पिंपरद, निंबळक फाटा विसाव्यानंतर पालखी बरड येथे मुक्कामी पोहोचेल.

३० जून २०२५, सोमवार: बरड, साधुबुवाचा ओढा, धर्मपुरी कॅनाॅल, कारुंडे, शिंगणापूर फाटा, पानसकरवाडी येथे विसाव्यानंतर रात्री मुक्कामासाठी नातेपुते येथे पोहोचेल.

१ जुलै २०२५, मंगळवार: नातेपुते, मांडवी ओढा, पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण, त्यानंतर माळशिरस येथे मुक्काम.

२ जुलै २०२५, बुधवार: माळशिरस येथे दुसरे गोल रिंगण खुडूस फाटा येथे होईल. पालखी विंझोरी ज्ञानेश्वर नगर, धावाबावी मार्गे वेळापूर येथे पोहोचेल.

३ जुलै २०२५, गुरुवार: वेळापूर येथे ठाकुरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होईल. पालखी तोंडले-बोंडले, वाडीकुरोली मार्गे भंडीशेगाव येथे मुक्काम करेल.

४ जुलै २०२५, शुक्रवार: भंडीशेगाव येथे दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण बाजीरावची विहीर येथे होईल. पालखी वाखरी येथे पोहोचेल, जिथे पादुका आरती होईल.

५ जुलै २०२५, शनिवार: वाखरी येथे तिसरे उभे रिंगण होईल. पालखी पंढरपूर येथे दाखल होईल.

६ जुलै २०२५, रविवार: आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे नगरप्रदक्षिणा आणि श्रींचे चंद्रभागा स्नान होईल.

१० जुलै २०२५, गुरुवार: आषाढ शुध्द १५ रोजी श्रींचे चंद्रभागा स्नान, गोपाळपूर काला आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी भेटीचा सोहळा साजरा होईल. याच दिवशी पालखी परतीच्या प्रवासासाठी वाखरी येथे मार्गस्थ होईल.

परतीचा प्रवास –

परतीचा प्रवास १० जुलै २०२५ रोजी सुरू होईल. पालखी वाखरी, वेळापूर, नातेपुते, फलटण, पाडेगाव,  वाल्हे, सासवड, हडपसर, भवानी पेठ, पुणे येथे मुक्कामानंतर २१ जुलै २०२५ रोजी आळंदीत पोहोचेल. आळंदीत नगरप्रदक्षिणा आणि हजेरी मारुती मंदिर येथे नारळ प्रसाद वाटप होऊन समारोप होईल.

पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य –

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा वारकरी संप्रदायाच्या भक्तीचे आणि एकतेचे प्रतीक आहे. या सोहळ्यात लाखो वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात, “पुंडलिक वरदे हरिविठ्ठल”, “जय जय रामकृष्ण हरी”, “ज्ञानोबा तुकाराम”  च्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करतात. रिंगण सोहळे, ज्यात उभे आणि गोल रिंगण आयोजित केले जातात, हे वारकऱ्यांच्या उत्साहाचे आणि भक्तीचे केंद्रबिंदू असतात. यंदा पुणे, सासवड आणि लोणंद येथील विस्तारित मुक्कामामुळे वारकऱ्यांना विश्रांती आणि भक्तीचा अनुभव घेण्यास अधिक वेळ मिळेल.

संस्थानची तयारी –
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांनी या सोहळ्यासाठी व्यापक तयारी केली आहे. पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे आणि अग्निशमन व्यवस्था यांसारख्या सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा यशस्वी होण्यासाठी तयारी सुरू आहे. प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ गुरू शांतिनाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे, तसेच विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे (कबीरबुवा), ॲड. डॉ. रोहिणी पवार, ॲड. राजेंद्र बाबुराव उमाप, पुरुषोत्तम महाराज पाटील आणि पालखी सोहळा मालक बाळासाहेब पवार (आरफळकर) यांच्यासह कर्मचारी वर्ग या सोहळ्याच्या व्यवस्थापनात सक्रिय सहभागी आहेत. शेकडो दिंड्यांसह लाखो वारकरी आळंदी ते पंढरपूर पायी चालत हा प्रवास करतात.

alandivarta