Friday

01-08-2025 Vol 19

संत मुक्ताईंचा ७२८वा अंतर्धान समाधी सोहळा हरीनाम गजरात संपन्न

मुक्ताईनगर: जळगाव जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या मुक्ताईनगर येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची बहीण आदिशक्ती संत मुक्ताई यांचा ७२८वा अंतर्धान समाधी सोहळा तापी तीरावर २२ मे रोजी भक्तिभावात हरीनाम गजरात संपन्न झाला. या पावन सोहळ्याला हाजारो भाविक उपस्थित होते. २३ मे रोजी एकादशीला सकाळी ८ वाजता मुक्ताई मूळ मंदिर ते नवीन मुक्ताई मंदिर अशी श्री पांडुरंगाची भव्य पालखी मिरवणूक होणार आहे.

सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर समिती, रुक्मिणी माता संस्थान (कौंडिण्यपूर), भक्तराज संत नामदेव संस्थान (पंढरपूर), संत निवृत्तीनाथ संस्थान (त्र्यंबकेश्वर), संत एकनाथ संस्थान (पैठण), रेडेश्वर संस्थान (आळेफाटा), संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान (आळंदी), संत तुकाराम महाराज संस्थान (देहू) आणि संत सोपानकाका संस्थान (सासवड) येथून संतांच्या पादुका आणि संस्थांनाचे पदाधिकारी परंपरेनुसार सहभागी झाले. श्री संत नामदेव महाराजांचे १६वे वंशज ह.भ.प. केशवदास नामदास महाराज पंढरपूरकर यांचे कीर्तन होऊन, गुलाल पुष्पवृष्टी, महाआरतीने सोहळा संपन्न झाला.

ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तनाचा लाभ –
ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठाचे नेतृत्व हरिभक्त परायण संदीप महाराज खामनिकर यांनी केले. दररोज रात्री विविध संत संस्थानांच्या प्रतिनिधी यांचे सुश्राव्य कीर्तनाचा लाभ भाविक आणि वारकऱ्यांनी घेतला. संत मुक्ताईंच्या समाधी सोहळ्याने मुक्ताईनगर परिसर भक्तिमय झाला होता.

alandivarta