Sunday

03-08-2025 Vol 19

माउलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावर अतिपावसाचे सावट, प्रशासनासमोर आव्हाने

आळंदी वार्ता: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यावर यंदा अतिपावसाचे सावट आहे. इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे आणि हवामान खात्याने वर्तवलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाला सतर्क राहावे लागणार आहे. अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या या सोहळ्यासाठी प्रशासनासमोर भाविकांच्या सुरक्षेचे मोठे आव्हान आहे.

माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा इंद्रायणी नदी घाटानजिक माऊली देऊळवाड्यात पार पडतो. या काळात लाखो वारकरी हरिनामाच्या गजरात नदीकाठावर जमा होतात. दर्शनबारीसाठी भक्ती-सोपान पुलावरून भाविक मंदिरात येतात. मात्र, गेल्या मे महिन्यात पहिल्या पावसात हा पूल पाण्याखाली गेला होता. सध्या इंद्रायणीच्या परिसरात मावळपासून आळंदीपर्यंत दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. पुढील दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची भीती आहे.

प्रशासनासमोरील आव्हाने:

भक्ती-सोपान पूल:अतिपावसामुळे पूल पाण्याखाली गेल्यास दर्शनबारी ऐनवेळी बंद करावी लागेल.

स्कायवॉक पूल: सध्या फॅब्रिकने तात्पुरता जोडलेला स्कायवॉक पूल पावसामुळे अपूर्ण आहे. त्याचा दक्षिणेकडील भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दर्शनबारी पूर्ण बंद होण्याचा धोका आहे.

दर्शनबारीची मर्यादा: नदीपलीकडील तात्पुरत्या दर्शनबारीत ५ ते ६ हजार भाविकांचीच क्षमता आहे. अतिपावसात भाविकांची प्रचंड गैरसोय होऊ शकते.

पाण्याचा निचरा: शहरातील सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहून नेण्याची व्यवस्था अतिवृष्टीत अपुरी पडते, ज्यामुळे रस्ते तुंबण्याचा धोका आहे.

भगीरथी नाला आणि भराव रस्ता: येथे पाण्याची कोंडी होऊन भाविकांचे हाल होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाची तयारी अपुरी?

मावळातून येणारा पाण्याचा लोंढा इंद्रायणीची पाणीपातळी वाढवत आहे. लाखो भाविकांचा समुदाय आळंदीत दाखल होणार असताना, प्रशासनाच्या ऐनवेळीच्या उपाययोजना अपुऱ्या पडताना दिसत आहेत. स्कायवॉकच्या कामाला पावसाचा अडथळा होत असून, भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाला हवामानाचा अंदाज आणि पाणीपातळीचा विचार करून तातडीने उपाययोजना कराव्या लागणार आहेत, अन्यथा भाविकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.

alandivarta