विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म |भेदाभेदभ्रम अमंगळ ||१||
आइका जी तुम्ही भक्त भागवत | कराल तें हित सत्य करा ||धृ.||
कोणाही जिवाचा न घडावा मत्सर | वर्म सर्वेश्वर पूजनाचे ||३||
तुका म्हणे एका देहाचे अवयव | सुखदुःख जीव भोगपावे ||४||”
अर्थ – चिंतनासाठी निवडलेला हा अभंग महान भागवत भक्त विश्ववंदनीय संत सम्राट संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून विश्वधर्माचा विश्व ऐक्याचा एकतेचा महान मंत्र सांगितलेला आहे. संपूर्ण जग हे विष्णुमय आहे, देवरूप आहे, देव स्वरूप आहे, देव सर्व चराचरांमध्ये भरलेला आहे. सर्वच जीव ईश्वराचे अंश आहेत ईश्वर प्रत्येक जीवात आहे. हाच वैष्णवांचा धर्म आहे. या ठिकाणी विश्वातील समानतेचा, मानवतेचा, एकतेचा संदेश सांगितलेला आहे. कोणी कोणत्याही प्रकारचा लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, काळा-गोरा, उच्च-ठेंगू, कोणत्या जातीचा, पंथाचा, मार्गाचा, संप्रदायाचा असा भेदभाव करू नये.
कोणत्याही प्रकाराहून पडणारे समाजातील भेदभाव हे अपवित्र, अमंगळ, असत्य आहेत. कोणालाही आपण कमी समजू नये. जे भगवंताचे भक्त असतील, साधक असतील,वारकरी असतील कोणतीही साधना करणारे असतील. त्यांनी हे लक्षात ठेवून आपले हित सत्य केले पाहिजे. आपल्याकडून कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये. कोणत्याही प्रकारचा त्यांचा द्वेष करू नये. हेच ईश्वराच्या पूजेचं वर्म आहे.
आपले कर्म इंद्रिये, ज्ञान इंद्रिये हे सर्व एकाच देहाचे अवयव आहेत. व त्यांनी सेवन केलेल्या विषयांचे सुख दुःख भोगणारा अंतर्यामी एक जीवच आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात संत कोणत्याही जाती, कुळाचा विचार करत नाहीत. संत तुकाराम महाराजांच्या विचारामुळे, वारकरी संप्रदायाच्या विचारामुळे, वैष्णवांच्या या विचारामुळे सामाज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सामाजिक समता, बंधुता, ऐक्य आजही टिकून आहे. हे वैष्णव संप्रदायाचे, वैष्णवांचे, वारकऱ्यांचे खूप मोठे यश आहे आणि ते आपल्याला मान्य करावेच लागते.
पंढरपूरच्या पालखी सोहळ्यामध्ये, पंढरीच्या वारीमध्ये आपणास प्रत्येकास दिसून आल्याशिवाय राहत नाही. सगळेजण गुण्यागोविंदाने एकत्रित येतात. कोणी कोणताही विचार करीत नाही. एका देहाच्या अवयवाप्रमाणे ते सर्व एकत्रित सुखाने, आनंदाने समाधानाने राहतात. हीच संत तुकाराम महाराजांची शिकवण आहे.
लेखक – श्री.ह.भ.प.प्रा.डॉ. पांडुरंग महाराज मिसाळ, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव (आळंदी), जि. पुणे.