आळंदी वार्ता : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आळंदीला भेट देऊन ज्ञानभूमी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या प्रकल्पाला गती देण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.बावनकुळे यांनी देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळासोबत प्रकल्पाच्या प्रगतीवर सविस्तर चर्चा केली.
सुमारे ४५० एकर जागेत साकारत असलेल्या या प्रकल्पाचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले, “ज्ञानभूमी प्रकल्प वारकऱ्यांसाठी तसेच राज्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विकासासाठी मैलाचा दगड ठरेल. यासाठी शासन स्तरावरून सर्व आवश्यक मदत केली जाईल. “याप्रसंगी त्यांनी प्रकल्पामुळे वारकऱ्यांना आधुनिक सुविधा मिळतील आणि आळंदीच्या वैभवात भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, माऊलींच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त राज्यभरात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम, उपक्रम आणि उत्सव आयोजित व्हावेत यासाठी शासन स्तरावर जी.आर. काढला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
याबाबतची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्सवात करतील, असेही ते म्हणाले.आळंदी येथे सुरू असलेल्या या भव्य सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक दाखल झाले असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे.