Sunday

03-08-2025 Vol 19

आळंदीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती उत्साहात साजरी

आळंदी वार्ता: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आळंदीत भारतीय जनता पार्टी (भाजपा) मंडळ, सेवाभावी व्यक्ती, संस्था आणि नागरिकांच्या वतीने विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले.

आळंदीतील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा स्मारक येथे पुष्पहार अर्पण आणि प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. इंद्रायणी नदी घाट परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच, विद्युत रोषणाईने सजलेल्या घोड्याच्या बग्गीतून राजमाता अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याची वैभवशाली मिरवणूक काढण्यात आली. “यळकोट यळकोट जय मल्हार”च्या जयघोषात, फटाक्यांच्या आतषबाजी आणि लक्षवेधी लेझर शोसह ही मिरवणूक धार्मिक परंपरांचे पालन करीत जल्लोषात पार पडली.

मिरवणुकीदरम्यान आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमाजी नरके यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख संजय घुंडरे पाटील, शिवसेना आळंदी उपशहर प्रमुख माऊली घुंडरे पाटील, शाखा प्रमुख रोहिदास कदम, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, मंडूबाबा पालवे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते. हजेरी मारुती आरती ग्रुपच्या वतीनेही पुतळा स्मारक येथे अभिवादन करण्यात आले.

भाजपा आळंदी मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमास मंडळ अध्यक्षा व माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख संजय घुंडरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संयोजन करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख संजय घुंडरे पाटील, माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, रामदास भोसले पाटील, माजी नगरसेवक दिनेश घुले, ज्ञानेश्वर रायकर, रुक्मिणी ताई कांबळे, सचिन काळे, सुदाम उकिरडे, मंडल सरचिटणीस आकाश जोशी, संकेत वाघमारे, भागवत काटकर, वासुदेव तुर्की, शंतनू पोफळे, शुभम दुर्वे, अभिषेक उमरगेकर, विशाल भागवत, महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष मंगला हुंडारे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, समाज बांधव आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

आळंदी नगरपरिषद सभागृहात शासकीय पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी नगरपरिषद कर्मचारी, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जोपासत आळंदीत हा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.

तर लहान मुलींनी या मिरवणुकीत लाठीकाठी व युध्द कलेचे प्रात्यक्षिक केले. या प्रत्यक्षिकांचे नागरिकांकडून कौतुक होत होते.

alandivarta