Saturday

02-08-2025 Vol 19

आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी; मानाची बैलजोडी जुंपून रथाची चाचणी यशस्वी

आळंदी वार्ता – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान येत्या 19 जून रोजी रात्री 8 वाजता आळंदी येथून होणार आहे. यंदा माऊलींचे 750 वे जन्मोत्सव वर्ष असल्याने या सोहळ्याला लाखोंच्या संख्येने वारकरी आणि भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. प्रस्थानाला अवघे 9 दिवस शिल्लक असताना आळंदी देवस्थान, नगरपरिषद, पोलिस प्रशासन, आरोग्य आणि महसूल विभाग युद्धपातळीवर तयारी करत आहेत. यंदा पावसाचे प्रमाण जास्त राहण्याचा अंदाज असल्याने शासनाकडून निवारा आणि विजेच्या चोख व्यवस्थेची मागणी करण्यात आली आहे.

सर्वंकष तयारी अंतिम टप्प्यात –
आळंदी येथील मंदिरापासून पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंतच्या सर्व व्यवस्थेची तीन ते चार वेळा माऊली संस्थान विश्वस्तांनी पाहणी पूर्ण झाली आहे. काही दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व विभागांचे प्रमुख सचिव, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सरकारी यंत्रणांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. प्रत्येक विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, पालखी मार्गावरील जलस्त्रोतांचे निर्जंतुकीकरण, वाहतूक व्यवस्था आणि पोलिस बंदोबस्ताची तयारी जोरात सुरू आहे.

मानाची बैलजोडी जुंपून रथाची चाचणी यशस्वी –
माऊलींच्या पादुका आणि पालखी ज्या रथात ठेवली जाते त्या चांदीच्या रथाची डागडुजी, पाॅलिश, रंगकाम पूर्ण झाले आहे. यंदा बैलजोडीचा मान घुंडरे कुटुंबियांना मिळाला आहे. मानाची बैलजोडी जुंपून आज मंगळवारी (दि. 10) सकाळी चाकण रोडवर यशस्वी चाचणी घेण्यात आली. यावेळी बैलजोडी मानकरी, देवस्थान कर्मचारी उपस्थित होते. आणखी काही वेळा चाचणी घेतली जाणार आहे.

दर्शनबारी मंडप उभारणी सुरू –
18 जूनला संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान आहे. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रस्थान सोहळ्याला आलेले भाविक माऊलींच्या समाधी दर्शन घेतात. लाखो वारकरी असल्याने नेहमीची दर्शनबारी व्यवस्था अपूरी पडते. त्यामुळे इंद्रायणीच्या पलीकडे दर्शनमंडप उभारणी सुरु आहे. बांबू बांधणी सुरु असून पुढील तीन दिवसांत पत्रा बसवला जाणार असल्याचे, आळंदी नगरपरिषदेचे नगर अभियंता संजय गिरमे यांनी सांगितले. यावर्षी भक्तीसोपान पुल जीर्ण झाला असल्याने नवीन स्कायवाॅक पूलावरून दर्शनबारी असणार आहे.

पालखी सोहळ्याचे स्वरूप –
प्रस्थान सोहळ्यादरम्यान माऊलींच्या पादुका पालखी रथात ठेवल्या जातात. रथापुढे शितोळे सरकारांचे अश्व, नगारा आणि 27 दिंड्या असतात, तर रथामागे 350 दिंड्या आणि मोठ्या संख्येने मोकळ्या दिंड्या सहभागी होतात. प्रस्थानाच्या वेळी माऊली मंदिर परिसरात रथापुढील 27 आणि रथामागील 20 दिंड्यांना प्रवेश दिला जातो. यंदा दर्शनबारी भक्ती सोपान पुलावरून नसून नवीन स्कायवॉकवरून आयोजित केली जाणार आहे. प्रस्थानाच्या दिवशी गुरुवार असल्याने रात्री 8 वाजता सोहळा सुरू होईल, वारकरी, भाविकांनी दुपारपासूनच मंदिर परिसरात गर्दी करून नये असे, आवाहन माऊली संस्थानकडून करण्यात आले आहे.

पावसाळी तयारी आणि अपेक्षित गर्दी –
यंदा चांगल्या पावसामुळे शेतकरी शेतीची कामे आणि पेरणी पूर्ण करून 5 ते 6 लाख भाविक पालखी सोहळ्यासाठी येण्याची शक्यता आहे. पालखी मार्गावरील गावांमध्ये हा सोहळा दिवाळीपेक्षा मोठा उत्सव मानला जातो. आषाढी आणि कार्तिकी या वारकरी संप्रदायातील दोन प्रमुख वाऱ्या असून, आषाढी ही मुख्य महावारी आहे. पंढरपूर हे आद्य क्षेत्र असून, हजारो वर्षांपासून भाविक या वारीत सहभागी होतात. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा स्वतंत्र पालखी सोहळा 1832 मध्ये श्री गुरू हैबतबाबा यांनी सुरू केला. त्यापूर्वी ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा एकत्र होता.

माऊलींच्या 750 व्या जन्मोत्सव वर्षाचे औचित्य –

यंदा माऊलींच्या 750 व्या जन्मोत्सव वर्षानिमित्त हा सोहळा अधिक भव्य होणार आहे. 19 जून रोजी प्रस्थानानंतर 20 जूनला पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होईल आणि 20 व 21 जूनला पुण्यात मुक्काम करेल. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. हा सोहळा अखंड हिंदुस्थानचा अमूल्य ठेवा असून, संत आणि भक्तांच्या भक्तीचा महान संगम आहे.

प्रस्थान सोहळ्याची वैशिष्ट्ये –

प्रस्थान: 19 जून 2025, रात्री 8 वाजता (गुरुवार)

दर्शनबारी: एकावेळी 10 हजार भाविकांसाठी व्यवस्था

पालखी रथ: पॉलिशिंग आणि दुरुस्ती पूर्ण, बैलांद्वारे चाचणी यशस्वी

दिंड्या: रथापुढे 27, रथामागे 350, मोकळ्या दिंड्यांची वाढती संख्या

पादुका: संत ज्ञानेश्वर महाराजांचे प्रतीक म्हणून पालखीत ठेवल्या जातात

प्रशासनाची तयारी –

पाहणी: मंदिर ते पंढरपूर मार्गाची 3-4 वेळा पाहणी पूर्ण

आढावा बैठक: सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, लोकप्रतिनिधींसह चर्चा

पावसाळी तयारी: निवारा आणि विजेची चोख व्यवस्था करण्याची मागणी

जलस्त्रोत: पालखी मार्गावरील पाण्याचे निर्जंतुकीकरण

वाहतूक आणि सुरक्षा: पोलिस आणि महसूल प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम

ऐतिहासिक महत्त्व –

पालखी सोहळ्याचा इतिहास: 1832 पासून श्री गुरू हैबतबाबा यांनी स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला

आद्य वारकरी: भगवान शंकर, पंढरपूर हे आद्य क्षेत्र

वारसा: तपोनिधी नारायण महाराज यांनी सुरु केला पालखी सोहळा

750 वे जन्मोत्सव वर्ष: संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्माला 750 वर्षे पूर्ण

महावारी: आषाढी ही वारकरी संप्रदायातील मुख्य वारी

“यंदा माऊलींच्या 750 व्या जन्मोत्सव वर्षानिमित्त पालखी सोहळा अधिक भव्य आणि दिमाखदार होणार आहे. लाखो वारकरी आणि भाविकांचा उत्साह, भक्ती आणि श्रद्धा यामुळे हा सोहळा अखंड हिंदुस्थानचा अमूल्य ठेवा आहे. प्रशासन आणि देवस्थान यांच्या संयुक्त प्रयत्नांनी सर्व व्यवस्था चोख ठेवण्यात येत आहे. सर्वांनी शांततेने आणि भक्तीभावाने या सोहळ्यात सहभागी व्हावे.”
ह.भ.प. चैतन्य महाराज लोंढे (कबीरबुवा), विश्वस्त, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती

alandivarta