आळंदी वार्ता: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी नगरपरिषदेत आज उपविभागीय अधिकारी (खेड) अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक पार पडली. बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, परिवहन, पाटबंधारे, पाणीपुरवठा, विद्युत वितरण कंपनी, पोलीस प्रशासन, तलाठी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी ९ वाजता पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आळंदीला भेट देऊन आषाढी पायवारीच्या तयारीचा आढावा घेतला.
नगरपरिषदेची तयारी:
मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी आषाढी वारीसाठी नियोजनाची माहिती दिली. वारीदरम्यान १,८०० फिरती शौचालये, १५ पिण्याच्या पाण्याचे टँकर, १८ टँकर मोबाइल शौचालयांसाठी, १० घंटागाड्या, ५ ट्रॅक्टर, २० सक्शन मशीन, ३ अग्निशमन वाहने आणि १ स्वच्छता मशीन तैनात असतील. १७ अधिकारी, २०० कर्मचारी आणि १५० स्वयंसेवक नियुक्त केले आहेत. शहरातील ड्रेनेज आणि स्टॉर्म वॉटर लाइन साफसफाई, १३० सीसीटीव्ही कॅमेरे, नदीघाटावर महिलांसाठी चेंजिंग रूम आणि धूर-औषध फवारणीची व्यवस्था असेल.
विद्युत विभाग:
उपकार्यकारी अभियंता (चाकण) यांनी सांगितले की, आळंदीचा विद्युत पुरवठा दोन वेगवेगळ्या वाहिन्यांद्वारे होतो. मंदिर परिसरात दोन रोहित्र, माऊली मंदिरासाठी २०० के.व्ही.ए. क्षमतेचा नवीन रोहित्र आणि सर्व रोहित्रांना एमआरपी फेसिंग बसवले आहे. १ जूनपर्यंत सर्व विद्युत वाहिन्यांचे मेंटेनन्स पूर्ण होईल. आपत्कालीन रोहित्रही ठेवले जाईल.
आरोग्य व्यवस्था:
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी सांगितले की, ३० बेड्ससह ४० राखीव बेड्स, ऑक्सिजन बेड, ११ रुग्णवाहिका आणि पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी धर्मशाळांमधील पाण्याचे नमुने तपासणी आणि प्रत्येक बूथवर आरोग्य सेवक नेमण्याचे आश्वासन दिले.
पाटबंधारे आणि बांधकाम:
पाटबंधारे विभागाने पावसाळ्यामुळे पाण्याची कमतरता नसल्याचे सांगितले, परंतु पाऊस कमी झाल्यास १० जूनपर्यंत पाणी सोडण्याचे निर्देश दौंडे यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते आणि साइड पट्ट्यांची दुरुस्ती १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे सांगितले.
पदाधिकाऱ्यांचे मुद्दे:
डी. डी. भोसले पाटील यांनी सिग्नल यंत्रणा, धोकादायक विद्युत खांबांचे स्थलांतर, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण हटवणे, रुग्णालयात अतिरिक्त बेड्स आणि दर्शनबारीसाठी जागा अधिग्रहणाचे मुद्दे मांडले.
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सूचना:
दौंडे यांनी रस्ते दुरुस्ती, अतिक्रमण हटवणे, व्हीआयपी पास, पार्किंग आणि हॉटेल तपासणीवर भर दिला. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस आणि नगरपरिषदेने संयुक्त कारवाई करावी, असे निर्देश दिले. पुढील आढावा बैठकीपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश देऊन त्यांनी बैठक संपवली. मुख्याधिकारी खांडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
दरम्यान, प्रशासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षित आणि सुविधाजनक वारीसाठी सर्वतोपरी तयारी सुरू केली आहे. यावेळी आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, अध्यक्षस्थानी खेड उपविभागीय अधिकारी अनिल दोंडे, आळंदी देवाची पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, डी.डी. भोसले पाटील, आळंदी शहर शिवसेनाप्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण, माजी नगरसेवक सचिन गिलबिले, आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक उर्मिला शिंदे, महावितरणचे संदीप पाटील, व इतर सर्व शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.