Wednesday

30-07-2025 Vol 19

माउलींच्या समाधीवर अक्षय्य तृतीयेला चंदनउटीत साकारला पांडुरंगाचा अवतार

आळंदी वार्ता: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र भूमीत, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर 30 एप्रिल रोजी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि स्वकाम सेवा कार्यकारी मंडळाच्या वतीने माउलींच्या समाधीवर भगवान पांडुरंगाचा अवतार चंदनउटीने साकारण्यात आला. या अलौकिक सजावटीने आळंदीतील समाधी मंदिरात पंढरपूरच्या पांडुरंगाचे साक्षात दर्शन घडले, ज्यामुळे भाविकांमध्ये ‘अलंकापुरीत पंढरपूर सामावले’ अशी भावना निर्माण झाली. मोगऱ्याच्या फुलांच्या सुवासिक सजावटीने गाभारा सुगंधित झाला, जणू माउलींचा ‘मोगरा फुलला’ हा अभंग प्रत्यक्षात अवतरला.

या अवतार निर्मितीसाठी 50 किलो गोपी चंदनउटीचा वापर करण्यात आला. पांडुरंगाच्या मूर्तीला भरजरी पोशाख, चमकदार आभूषणे आणि फुलांची माळांनी सजवण्यात आले. भाविकांना या प्रसंगी कैरीचे पन्हे आणि डाळ प्रसादाचे वाटपही करण्यात आले. सजावट, चंदनउटी आणि प्रसादाचा सर्व खर्च स्वकाम सेवा कार्यकारी मंडळामार्फत करण्यात आला, तर देवस्थानच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला.

सोहळ्याला प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ, विश्वस्त ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, विश्वस्त ॲड. डॉ. रोहिणी पवार, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्यासह स्वकाम सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील तापकीर, महिलाध्यक्षा आशा तापकीर, पर्यवेक्षक तुकाराम माने, मनसुख लोढा, सुभाष बोराटे, प्रकाश ठाकूर, आनंद अरबुज, दीपक पडवळ, सोमनाथ काळजे, संभाजी फुगे, संभाजी चौधरी, बाळासाहेब गांधिले, धनाजी गावडे, देवस्थानचे कर्मचारी आणि स्वकाम सेवा मंडळाचे स्वयंसेवक उपस्थित होते.

स्वकाम सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील तापकीर यांनी सांगितले की, “दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्षय्य तृतीयेनिमित्त चंदनउटी, सजावट आणि प्रसादाचे आयोजन मंडळाने केले. माउलींच्या समाधीवर पांडुरंगाचे रूप साकारण्याचा हा उपक्रम भाविकांसाठी आनंददायी ठरला.” या सजावटीने आणि पांडुरंगाच्या अवताराने भाविकांचे मन तृप्त झाले, हा सोहळा आळंदीच्या वैभवशाली परंपरेचा एक भाग आहे. भाविकांनी या दर्शनाचा लाभ घेत माउली आणि पांडुरंगाच्या चरणी आपली भक्ती अर्पण केली. अक्षय्य तृतीयेच्या या पावन प्रसंगी आळंदीतील समाधी मंदिर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाले.

alandivarta