आळंदी वार्ता: श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा येत्या 19 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. नांदेड येथील माऊली भक्त संतोष गणपतराव मोरगे यांनी माऊलींच्या चांदीच्या पालखी नूतनीकरणासाठी १२ किलो चांदी सोमवारी माऊलीचरणी अर्पण केली. याशिवाय, नूतनीकरण कार्यासाठी आणखी ४ किलो चांदी आणि मजुरीचा सर्व खर्च ते स्वतः उचलणार असून, हे कार्य १२ जूनपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे यांनी दिली.
पालखीच्या नूतनीकरणानिमित्त विश्वस्तांच्या हस्ते पूजन संपन्न झाले. यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त ॲड. रोहिणी पवार, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, माऊलींचे मानकरी राहुल चिताळकर पाटील, देवस्थान कर्मचारी तुकाराम माने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.