आळंदी वार्ता: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील मानाचे अश्व यंदाच्या आषाढी वारीसाठी रविवारी (ता. ८ जून) अंकली येथील शितोळे सरकार यांच्या वाड्यातून मार्गस्थ होणार आहेत. अंकली ते आळंदी हा सुमारे ३१५ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत हे अश्व बुधवारी (ता. १८ जून) पालखी प्रस्थानाच्या एक दिवस आधी आळंदी येथे दाखल होणार आहेत.
याबाबत माहिती देताना श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार म्हणाले, “यंदा पायी वारीचे १९३ वे वर्ष आहे. अकरा दिवसांचा प्रवास करून मानाचे अश्व परंपरेनुसार आळंदीतील प्रस्थान सोहळ्यासाठी माउलींच्या चरणी सेवा रुजू करतील.” रविवारी (ता. ८ जून) सकाळी १० वाजता अंकलीतील शितोळे सरकार यांच्या राजवाड्यातील अंबाबाई मातेच्या मंदिरात विधिवत पूजन, आरती आणि जरीपटक्याचे पूजन होईल. यानंतर जरीपटका स्वाराच्या स्वाधीन केला जाईल. दोन्ही अश्वांसह वाहनांचे पूजन झाल्यावर दिंडीसह अश्व राजवाड्यातून मार्गस्थ होतील.
प्रवासाचा पहिला मुक्काम सांगली जिल्ह्यातील मिरज येथे असेल. दुसऱ्या दिवशी (ता. ९) सांगलवाडी, १० जूनला इस्लामपूर-पेठनाका, ११ जूनला वहागाव, १२ जूनला भरतगाव, १३ जूनला भुईंज, १४ जूनला सारोळा, १५ जूनला शिंदेवाडी, तर १६ आणि १७ जूनला पुणे येथे अश्वांचा मुक्काम असेल. बुधवारी (ता. १८) हे अश्व आळंदी येथे पोहोचतील. गुरुवारी (ता. १९) संत ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी मंदिरात प्रस्थान सोहळ्यासाठी मानाचे अश्व सेवा रुजू करतील. 19 जूनला रात्री माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार असून पाहिला मुक्काम आळंदी येथेच आहे. 20 जूनला सकाळी पालखी पुणे कडे मार्गस्थ होईल. 20 आणि 21 जून दोन दिवस पुणे येथे मुक्काम होईल. 5 जुलै ला पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचेल.
यंदा आषाढी वारी 6 जुलै रोजी आहे. अश्व परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व असून, मानाच्या अश्वांचा हा प्रवास वारकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा आहे. माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी सर्व तयारी जोमाने सुरू असल्याचे चित्र आळंदीत दिसून येत आहे.