Sunday

03-08-2025 Vol 19

आळंदीत वाहतूक कोंडीचा त्रास; बेशिस्त पार्किंगवर नागरिक संतप्त

आळंदी वार्ता: आळंदी शहरात लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींना वाहने पार्क करण्याची मंगल कार्याल्यांची अपुरी सुविधा असल्यामुळे वाहने बेशिस्तपणे रस्त्यावर दुतर्फा वाहने पार्किंग केल्याने सलग दुसऱ्या दिवशी नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. वडगांव रोड, मरकळ रोड, प्रदक्षिणा मार्ग आणि चाकण चौकात वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिकांची गैरसोय झाली. रस्त्यांवर चालणे आणि रस्ता ओलांडणेही कठीण झाले आहे.

प्रदक्षिणा मार्गावर दुतर्फा चारचाकी वाहने दिवसभर पार्क केली जातात, परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मात्र, दुचाकी वाहन उभे केल्यास तात्काळ कारवाई करून वाहन उचलले जाते, अशी टीका स्थानिक नागरिक मंगेश तिताडे यांनी केली. “चारचाकी वाहनांवरही दुचाकींप्रमाणे कारवाई व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली.

वाहतूक कोंडीत जड वाहनांचा शहरातील प्रवेशामुळे आणखी भर पडत आहे. बेशिस्त वाहनचालक रस्त्यावर बेफाम वळणे घेतात आणि वाहने पार्क करतात, ज्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. याबाबत वाहनचालकांना चूक दाखवल्यास वादविवादाचे प्रसंग घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

नागरिकांची मागणी: कठोर उपाययोजना आणि सुसज्ज वाहनतळाची गरज

नागरिकांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रदक्षिणा मार्गावर चारचाकी वाहनांच्या पार्किंगवर कडक कारवाई, जड वाहनांसाठी निर्धारित वेळ, बाह्यवळण रस्त्याची सुस्थिती आणि देहफाटा चौकातील विजेच्या खांबांचा अडथळा दूर करण्याची मागणी आहे. तसेच, नगरपालिका प्रशासन आणि वाहतूक विभागाने समन्वय साधून सुसज्ज वाहनतळ उभारावे, अशी सूचना नागरिकांनी केली आहे.

वाहतूक विभाग आणि नगरपालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलून ही समस्या सोडवावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

alandivarta