Saturday

02-08-2025 Vol 19

आळंदीतील सिद्धबेट परिसरात सांडपाणी आणि खराब रस्त्यामुळे भाविक संतप्त; प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

आळंदी वार्ता: आळंदीतील पवित्र सिद्धबेट परिसराच्या प्रवेशद्वाराजवळ ड्रेनेज तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर साचले आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, भाविक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सांडपाणी थेट सिद्धबेट परिसरात वाहत असल्याने या पवित्र स्थळाच्या पावित्र्याला धक्का बसत असल्याचा संताप भाविकांमध्ये पसरला आहे.

संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांची लीला भूमी म्हणून सिद्धबेट परिसराला विशेष महत्त्व आहे. वर्षभर देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात, विशेषत: पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान येथील भाविकांची संख्या लक्षणीय असते. मात्र, सध्या तुंबलेल्या ड्रेनेजमुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेने भाविकांचा हिरमोड झाला आहे. स्थानिक नागरिक आणि भाविकांनी आळंदी पालिका प्रशासनाकडे चेंबर स्वच्छता आणि ड्रेनेज दुरुस्तीची तातडीने मागणी केली आहे.

याशिवाय, सिद्धबेट प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर मातीमुळे चिखल झाला असून, काही ठिकाणी रस्ता खचल्याने वृद्ध आणि चालणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. यामुळे रस्त्याची त्वरित डागडुजी करून सुरक्षित आणि सुलभ वाटचाल सुनिश्चित करण्याची मागणीही नागरिकांनी लावून धरली आहे.

स्थानिक प्रशासनाने या गंभीर समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाविक आणि नागरिकांनी केली आहे. प्रशासन या समस्यांचे निराकरण कधी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

alandivarta