Wednesday

30-07-2025 Vol 19

श्री ज्ञानेश्वर विद्यालयात महाराष्ट्र दिन, कामगार दिन उत्साहात; माऊली देवस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्तांचा भव्य सन्मान

आळंदी : श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज येथे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा झाला. शिक्षक जयवंत खुंटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, त्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीताने सर्वांनी ध्वजाला मानवंदना दिली. या क्षणी उपस्थितांमध्ये देशप्रेम आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची भावना जागृत झाली. याचवेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्तांचा सन्मान आणि संस्थेचे खजिनदार डॉ. दीपक पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा भव्य स्वरूपात पार पडला.

नवनिर्वाचित विश्वस्तांचा सन्मान –

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तपदी निवड झालेले ज्ञानेश्वर विद्यालयाचे माजी विद्यार्थी ह.भ.प. चैतन्य महाराज लोंढे (कबीर बुवा), ह.भ.प. पुरुषोत्तमदादा महाराज पाटील आणि पुण्याच्या ॲड. डॉ. रोहिणी पवार यांचा शाल, श्रीफळ, माऊलींची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

सचिव अजित वडगांवकर यांनी प्रास्ताविकात कबीर बुवा आणि पुरुषोत्तमदादा यांच्या सांप्रदायिक वारशाची आणि सामाजिक योगदानाची माहिती दिली. त्यांनी या निवडीमुळे संस्थेला अभिमान वाटत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, रोहिणी पवार यांची मुक्ताईच्या रूपाने प्रथमच महिलेची विश्वस्तपदी निवड झाल्याने आनंद व्यक्त करत, त्यांच्याकडून मंदिरात आणि वारीच्या वाटेवर महिला प्रश्नांवर मोलाचे योगदान अपेक्षित असल्याचे नमूद केले.

डॉ. दीपक पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा –

संस्थेचे खजिनदार डॉ. दीपक पाटील यांचा पारंपरिक पद्धतीने औक्षण करून अभिष्टचिंतन सोहळा साजरा झाला. त्यांना शाल, श्रीफळ, माऊलींची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. डॉ. पाटील यांनी दरवर्षीच्या या प्रेमळ सन्मानाबद्दल सर्वांचे आभार मानले.

संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे आणि इतर मान्यवरांनी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या प्रगतीपथावरील यशाचे श्रेय संत परंपरेला आणि विश्वस्तांच्या सहकार्याला दिले. भविष्यात कीर्तनकार, प्रवचनकार आणि समाज प्रबोधनकारांचा सन्मान सोहळा भव्य स्वरूपात आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. यापूर्वी संस्थानने शिक्षण संस्थेला दिलेले सहकार्य आणि भविष्यातही तसेच सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी नवनिर्वाचित विश्वस्तांकडे व्यक्त केली.

विश्वस्तांचे मनोगत –

ह.भ.प. चैतन्य महाराज लोंढे यांनी शाळेपासून अध्यात्मिक क्षेत्रातील आपला प्रवास उलगडला आणि शिक्षकांनी घडवलेल्या संस्कारांमुळे यशाच्या शिखरावर पोहोचल्याचे सांगितले. त्यांनी संस्थेतील “ओळख श्री ज्ञानेश्वरीची” या उपक्रमाचे कौतुक करत, ज्ञानदेवांचे विचार जगभर पोहोचवण्यासाठी संस्थान खंबीरपणे सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. ह.भ.प. पुरुषोत्तमदादा आणि ॲड. डॉ. रोहिणी पवार यांनी सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत संस्थानची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.

उपस्थित मान्यवर –

कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, ज्येष्ठ विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, विलास घुंडरे, पश्चिम महाराष्ट्र भाजपा अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष संजय घुंडरे, माजी सभापती श्रीधर कुऱ्हाडे, संस्था सदस्य आनंदराव मुंगसे, साहेबराव कुऱ्हाडे, जगदीश भोळे, अनिल वडगांवकर, माजी नगरसेवक नितीन घुंडरे, चरित्र समितीचे धनाजी काळे, विश्वंभर पाटील, विलास वाघमारे, चंद्रकांत गोरे, पत्रकार दादासाहेब कारंडे, अनिल जोगदंड, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचा समारोप –

अध्यक्षीय मनोगतात ह.भ.प. बाळासाहेब शेवाळे यांनी नवनिर्वाचित विश्वस्त आणि डॉ. दीपक पाटील यांना शुभेच्छा दिल्या. योगेश मठपती यांनी सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले. शेवाळे महाराज यांच्या वाणीतून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. हा सोहळा शिक्षण, संस्कार आणि संत परंपरेचा गौरव करणारा प्रेरणादायी क्षण ठरला.

alandivarta