Wednesday

30-07-2025 Vol 19

आळंदीत बिबट्याचा पुन्हा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाकडून जनजागृती

आळंदी वार्ता: आळंदी ग्रामीण हद्दीत पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या मागील बाजूस तसेच इंद्रायणी नदीजवळील थोरवे यांच्या उसाच्या शेतात प्रथम बिबट्या दिसला. आज सकाळी पुन्हा त्याच परिसरात तो आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून, वनरक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

वनरक्षक गवळी यांनी स्थानिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, बिबट्यासोबत लहान पिल्ले असल्याने तो या परिसरात थांबला आहे. “लहान पिल्लांमुळे त्याला बाहेर पडणे शक्य होत नाही. पिंजरा लावल्यास पिल्लांना इजा होऊ शकते, ज्यामुळे बिबट्या आक्रमक होण्याची शक्यता आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी रात्री गस्त घालण्याचे आश्वासन दिले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आणि सद्यस्थिती लक्षात घेता, वनविभागाचे अधिकारी मुख्याधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी चर्चा करणार आहेत.

नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी फ्लेक्स लावण्यात येणार असून, सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, बिबट्याने परिसरातील ८ ते १० कुत्र्यांना ठार केले आहे. तसेच, उसाच्या शेतातील लिंबाच्या झाडावर बिबट्या दिसल्याचे काहींनी सांगितले.

वनविभागाच्या सूचना:

बिबट्याचा पाठलाग किंवा त्याला जखमी करू नये; तो हल्ला करू शकतो.

मुलांना एकटे सोडू नये, त्यांनी गटाने फिरावे.

अंधारात एकटे फिरताना गाणी म्हणावीत किंवा मोबाइलवर गाणे लावावे.

बिबट्या दिसल्यास जोरात ओरडावे, खाली वाकू नये किंवा झोपू नये.

रात्री उघड्यावर झोपू नये, एकट्याने बाहेर पडू नये.

लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.

गावाजवळील मोकाट कुत्रे, बकऱ्या, डुकरांची संख्या कमी करावी.

गुरांना गोठ्यात बांधताना गोठा बंदिस्त असावा.

बिबट्याचे अस्तित्व जाणवल्यास तातडीने वनपरिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधावा.

वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.

alandivarta