Thursday

31-07-2025 Vol 19

इंद्रायणी नदी प्रचंड प्रदूषणाच्या विळख्यात: भाविक-नागरिकांचा संताप, प्रशासनाचे दुर्लक्ष

आळंदी वार्ता: संत ज्ञानेश्वर माऊलींच्या तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदी प्रदूषण आणि जलपर्णीच्या विळख्यात सापडली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून रसायन आणि मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने शुक्रवारी नदी पुन्हा पांढऱ्या फेसाने फेसाळली. यामुळे भाविक, वारकरी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. 3मे पासून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जन्मोत्सवानिमित्त हरिनाम सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नदी स्वच्छतेच्या उपाययोजनांकडे शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.

इंद्रायणी नदीतील जलपर्णीची समस्या कायम असून, घाटांची तोडफोड आणि विद्रुपीकरणामुळे वारकरी संघटनांनीही प्रशासनाचा निषेध केला आहे. नदीवरील पाणी साठवण बंधारे गळतीमुळे निकामी झाले असून, भक्त पुंडलिक मंदिर परिसरातील बंधाऱ्याची देखभाल रखडली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने जलपर्णी काढण्यास सुरुवात केली असली, तरी काम संथगतीने सुरू आहे. स्मशानभूमी परिसरात जलपर्णी आणि राडारोडा साचल्याने स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष आणि प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचा अभाव यामुळे नदीचे प्रदूषण धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे. आतापर्यंत प्रदूषण रोखण्यासाठी अनेकांनी आंदोलने केली. उपोषणे केली. निवेदनांद्वारे मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी नोंदवल्या मात्र प्रशासन, शासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. आळंदी तीर्थक्षेत्राला वर्षभरात लाखो भाविक, वारकरी भेट देतात. आषाढी, कार्तिकी वारी यावेळी मोठी संख्या असते. आळंदीला भेट देणाऱ्या वारकऱ्यांना याच प्रदूषित पाण्यात स्नान करावे लागत आहे. प्रदूषित पाण्यात स्नान केल्याने अनेक भाविक वारकऱ्यांना त्वचारोगाचा त्रास झाला आहे.

alandivarta