आळंदी वार्ता: आळंदीतील वडगाव घेणंद रस्त्यावर चऱ्होली ग्रामपंचायत हद्दीत सुपर मॉलजवळ रस्त्याच्या कडेला नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्याचा ढीग आज झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावर वाहून गेला. या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या कचरा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सकाळपासून कोसळणाऱ्या पावसाने रस्त्यावर पाणी साचले आणि कचऱ्याचा ढीग वाहून रस्त्यावर पसरला. प्लास्टिक, कागद, कचरा आणि इतर टाकाऊ वस्तूंनी रस्ता अक्षरशः व्यापला. रस्त्यावरून वाहणारा हा कचरा पाण्यासोबत मिसळून दुर्गंधी पसरली, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कचऱ्यामुळे साचलेल्या पाण्यातून डास आणि रोगजंतूंचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर कचरा व्यवस्थापनाबाबत गंभीर आरोप केले आहेत. “कचरा उचलण्यासाठी प्रशासनाकडे कोणतीही ठोस व्यवस्था नाही. रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग सातत्याने वाढतात, पण कारवाई होत नाही,” अशी खंत एका नागरिकाने व्यक्त केली. या समस्येकडे चऱ्होली ग्रामपंचायत, आळंदी नगरपरिषद यांनी समन्वयाने तातडीने लक्ष देऊन कचरा व्यवस्थापनाची प्रभावी यंत्रणा राबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना न केल्यास नागरिकांच्या आरोग्याला अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.