आळंदी वार्ता: श्री क्षेत्र आळंदी नगरी आज भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर (७५० वा) सुवर्ण जन्मोत्सवाचा भव्य शुभारंभ शनिवारी सकाळी हजारो भाविकांच्या जयघोषात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. यासोबतच संत नामदेव महाराज यांचा ६७५ वा संजीवन समाधी सोहळा आणि संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा यांचे औचित्य साधून आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने आळंदीतील ‘ज्ञानकुंभा’ला प्रारंभ झाला. ‘चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेव डोळा पाहू’ असे म्हणत राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक अलंकापुरीत दाखल झाले आहेत.
भक्ती आणि अध्यात्माचा अनुपम संगम-
सकाळी ६ वाजता श्री विणा पूजन आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या विधिवत पूजनाने महोत्सवाची सुरुवात झाली. सुमारे सात हजार भाविकांनी उत्स्फूर्तपणे पारायण सोहळ्यात सहभाग नोंदवला. आळंदी देवस्थान आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन दहा एकरांहून अधिक क्षेत्रात भव्य मंडप उभारला आहे. यात पारायण, कीर्तन, प्रवचन, अन्नदान आणि भाविकांच्या निवास-जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या काळात भाविकांना दिलासा देण्यासाठी थंड पाणी, डी कूलर, पंखे आणि स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह डॉ. नारायण महाराज जाधव, संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, चैतन्य महाराज लोंढे (कबीर महाराज), अॅड. रोहिणी पवार, ह.भ.प. पुरुषोत्तम दादा पाटील, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, वैजयंती उमर्गेकर, बबनराव कुऱ्हाडे, नंदकुमार कुऱ्हाडे, संजय महाराज घुंडरे आणि असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. या सोहळ्याने आळंदी भक्तिरसात तल्लीन झाली असून, पुढील आठवडाभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
भाविकांसाठी जय्यत तयारी-
आळंदी देवस्थान, नगरपरिषद, पोलिस यंत्रणा आणि ग्रामस्थांनी भाविकांच्या सुविधेसाठी व्यापक तयारी केली आहे. कालपर्यंत पाच हजार भाविकांनी ऑनलाइन नोंदणी केली होती, आळंदी पंचक्रोशीतील तसेच राज्यभारतील सात हजार भाविक पारायणाला बसले आहेत. प्रत्येक सहभागी भाविकाला देवस्थानकडून मोफत ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ पुस्तिका दिल्या. स्वकाम सेवा मंडळाचे ४०० स्वयंसेवक, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे ४०० विद्यार्थी आणि विठ्ठल महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे २५० वारकरी स्वयंसेवक या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी झटत आहेत.
इंद्रायणी नदीत वडिवळे आणि आंद्रा धरणातून अनुक्रमे १५० आणि ३०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृह, १५० स्वच्छतागृहे, दररोज घाटाची स्वच्छता आणि कचरा वाहतुकीची व्यवस्था यामुळे भाविकांना कोणतीही अडचण भासणार नाही. मंडप परिसरात १०० पोलिस आणि २० पोलिस अधिकाऱ्यांचा तीन टप्प्यांत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी भाविकांच्या साहित्याची सुरक्षाही सुनिश्चित केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी दिली.
आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव-
हा आठवडाभराचा सोहळा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवाने नटला आहे. दररोज सकाळी ६ ते १० या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. याशिवाय, संत तुकाराम महाराज चरित्र चिंतन (३ ते ५ मे, रामभाऊ महाराज राऊत), संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र चिंतन (६ ते ८ मे, चैतन्य महाराज देगलूरकर) आणि संत नामदेव महाराज चरित्र चिंतन (९ मे, चंद्रशेखर महाराज देगलूरकर) यांच्या रसाळ वाणीतून भाविकांना आध्यात्मिक आनंदाचा अनुभव मिळणार आहे.
कीर्तन, प्रवचन, भजन आणि भारुडांचे कार्यक्रमही सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. शनिवारी बापूसाहेब महाराज देहूकर, चैतन्य महाराज कबीर, बाळासाहेब महाराज शेवाळे यांचे कीर्तन आणि प्रवचन, तर रविवारी अच्युत महाराज दस्तापुरकर, विष्णू महाराज केंद्रे, प्रमोद महाराज जगताप यांचे कार्यक्रम होतील. सोमवारी भागवत महाराज शिरवळकर, यशोधन महाराज साखरे, जयवंत महाराज बोधले, मंगळवारी प्रसाद महाराज बडवे, रामकृष्ण महाराज लहवितकर, पांडुरंग महाराज घुले, बुधवारी ज्ञानेश्वर महाराज नामदास, नारायण महाराज जाधव, केशव महाराज उखळीकर, गुरुवारी विठ्ठल महाराज वासकर, सदानंद महाराज मोरे, रामभाऊ महाराज राऊत, शुक्रवारी भरत महाराज पाटील, चंद्रशेखर महाराज देगलूरकर आणि शनिवारी शांतीब्रह्म मारोती महाराज कुरेकर यांचे काल्याचे कीर्तन होईल.
संगीत भजनांचे कार्यक्रमही भाविकांचे मन मोहून टाकतील. विश्वनाथ महाराज वारिंगे, कल्याण गायकवाड, विष्णू महाराज सोळंके, राधाकृष्ण गरड, आदिनाथ सटले, मुंबईतील महादेव युवा शहाबाजकर, परमेश्वर महाराज जायभाय, पंढरीनाथ आरू, महेश महाराज भगुरे, ज्ञानेश्वर महाराज मेश्राम आणि तामिळनाडूतील विठ्ठलदास महाराज यांची भजन-कीर्तन सेवा सोहळ्याला चार चाँद लावणार आहे. शुक्रवारी (ता. ९) रात्री सात वाजता दिंडी प्रदक्षिणा, इंद्रायणी गंगापूजन, दीपोत्सव आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे आळंदी नगरी उजळून निघणार आहे.
आळंदीकरांचा उत्साह आणि योगदान
आळंदी देवस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीर म्हणाले, “हा सोहळा केवळ धार्मिकच नाही, तर सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. भाविकांसाठी सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पहिल्या आणि शेवटच्या दिवशी अन्नदानाची सेवा आळंदीकर ग्रामस्थ करणार आहेत.” सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी सांगितले की, “हा महोत्सव संत ज्ञानेश्वर, नामदेव आणि तुकाराम महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा आहे. भाविकांना त्यांच्या चरित्रातून प्रेरणा मिळेल.”आळंदी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागप्रमुख श्रद्धा गर्जे यांनी नदी आणि घाट स्वच्छतेची हमी दिली.
चाकण-केळगाव रस्त्यावरील सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेसमोर उभारलेल्या मंडपात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि मंडळांचे कार्यकर्ते या सोहळ्यासाठी अहोरात्र झटत आहेत.वारकरी संप्रदायाचा गौरवसंत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी यांसारख्या ग्रंथांद्वारे मराठी भाषेत आध्यात्मिक विचारांचा पाया रचला. त्यांचा हा ७५० वा जन्मोत्सव वारकरी संप्रदायाच्या गौरवशाली परंपरेचा उत्सव आहे. संत नामदेव आणि संत तुकाराम यांच्या स्मृतींना अभिवादन करत हा सोहळा भक्ती, ज्ञान आणि योग यांच्या त्रिवेणी संगमाचे दर्शन घडवणार आहे.
आळंदीतील हा भव्य ‘ज्ञानकुंभ’ पुढील आठवडाभर भाविकांना अध्यात्म, भक्ती आणि सांस्कृतिक वैभवाचा अनुभव देणार आहे. लाखो वारकरी आणि भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल.