आळंदी वार्ता: संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750व्या जन्मोत्सव वर्षानिमित्त आळंदी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. त्यानंतर 15 जून रोजी आळंदी ग्रामस्थ आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने कृतज्ञता सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये सहभागी सेवक, देणगीदार आणि विविध संस्थांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
भक्तिमय वातावरणात पार पडला सोहळा-
आठ दिवस चाललेल्या या महाउत्सवात हरिनाम संकीर्तन, श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तनाचे कार्यक्रम मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात पार पडले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे विश्वस्त निलेश महाराज लोंढे (कबीरबुवा) यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “या सोहळ्यातील आध्यात्मिक ऊर्जा आणि चैतन्य अभूतपूर्व होते. माऊलींचे अस्तित्व प्रत्येक क्षणी जाणवत होते. यातून सर्वांना माऊलींचा आशीर्वाद प्राप्त झाला.” त्यांनी पुढे सांगितले की, माऊलींचे साहित्य आणि संस्कृतीचा वारसा महाराष्ट्रासह सर्वदूर पोहोचविण्याचे कार्य पुढेही सुरू राहील. यासाठी सर्वांनी एकत्रितपणे सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कृतज्ञता सन्मान सोहळा
या सोहळ्यानंतर कृतज्ञता सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला. यामध्ये अन्नदान, स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, विद्युत रोषणाई, श्रमदान, बंदोबस्त आणि पोलीस मित्र सेवा देणाऱ्या सेवकांचा तसेच देणगीदारांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आळंदी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि आळंदी पोलीस स्टेशन यांच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था, स्वकाम सेवा मंडळ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पिंपरी-चिंचवड सेवेकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास मुख्याधिकारी माधव खांडेकर, अन्नदाते विजय जगताप, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त राजेंद्र उमाप, पुरुषोत्तम महाराज पाटील, पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, राहुल चिताळकर, सुरेश वडगावकर, माजी विरोधी पक्षनेते डी.डी. भोसले, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, विलास घुंडरे, वासुदेव घुंडरे, रामदास भोसले, सागर भोसले, प्रशांत कुऱ्हाडे पाटील, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, आनंद मुंगसे, विष्णू वाघमारे, प्रकाश कुऱ्हाडे, रमेश गोगावले, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई कुऱ्हाडे पाटील, शिवसेना शहराध्यक्ष राहुल चव्हाण, किरण येळवंडे, नंदकुमार वडगावकर, सचिन घुंडरे, आळंदी देवस्थान व्यवस्थापक माउली वीर, रवींद्र जाधव, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, शाखा प्रमुख रोहिदास कदम, भजन सम्राट कल्याण गायकवाड, स्वकाम सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील तापकीर, आळंदी शहर पत्रकार बांधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याला बळ
या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आळंदीकर ग्रामस्थ, वारकरी, युवक आणि विविध सेवाभावी कार्यकर्ते यांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला. यावेळी आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष संजय महाराज घुंडरे यांनी आपले विचार व्यक्त करताना, माऊलींच्या विचारांचा आणि साहित्याचा प्रसार करण्याचे आवाहन केले. प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ आणि नंदकुमार कुऱ्हाडे यांनीही यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.
पसायदानाने सांगता
सोहळ्याची सांगता पसायदानाने झाली, त्यानंतर आळंदी ग्रामस्थांच्या वतीने स्नेहभोजन आणि महाप्रसाद वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन माजी उपाध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे पाटील यांनी केले. या सोहळ्याने आळंदीच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवाला अविस्मरणीय बनवले.