Wednesday

30-07-2025 Vol 19

आळंदी देवस्थानच्या भक्तनिवासासाठी १० कोटींचा पहिला हप्ता मंजूर

आळंदी वार्ता – संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंद्रायणी नदी पूजन कार्यक्रमात आळंदी देवस्थानच्या भक्तनिवास बांधकामासाठी २५ कोटी रुपये निधीची घोषणा केली होती. या घोषणेला अवघ्या एका महिन्याच्या आत प्रत्यक्ष कृतीत उतरत, भक्तनिवास बांधकामासाठी १० कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे. याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आल्याची माहिती आळंदी देवस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीर यांनी दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे आषाढी एकादशी वारीच्या पूर्वतयारीसाठी आयोजित आढावा बैठकीत ही प्रक्रिया गतीमान झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. बैठकीनंतर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते १० कोटींचा अध्यादेश आळंदी देवस्थानच्या प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ, विश्वस्त चैतन्य महाराज कबीर आणि व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांना सुपूर्द करण्यात आला.

हा निधी आळंदीला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी सुसज्ज भक्तनिवास बांधण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. यामुळे वारकरी आणि भाविकांना राहण्याची उत्तम सोय उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांनी राज्य सरकारचे आभार मानले असून, उर्वरित निधी लवकरच उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

alandivarta