आळंदी: आळंदी नगरपरिषदेने दि. 23 एप्रिल 2025 पासून रात्रंदिवस चालवलेल्या रायझिंग लाईन जोडणीचे काम दि. 25 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता यशस्वीरीत्या पूर्ण केले. यानंतर तात्काळ काळेवाडी येथील 5 लाख लिटर पाण्याची टाकी भरून गावात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. पद्मावती रोड येथील पहिल्या टप्प्यात पाणीवितरण झाले; मात्र, नवीन लाईनमुळे सुरुवातीला गढूळ पाणी आले. साखरे महाराज पुलावरील लाईन, जी एक वर्षापूर्वी जोडली गेली होती, उघडी असल्याने उन्हामुळे गंजली होती, ज्यामुळे गढूळपणाची समस्या उद्भवली.
दुसऱ्या टप्प्यात गढूळपणा 50% कमी झाला, तर तिसऱ्या टप्प्यात तो कमीत कमी आढळला. पूर्वीची 300 मि.मी. ची गळती असलेली लाईन बंद करून 400 मि.मी. ची नवीन लाईन जोडल्याने पाण्याची टाकी जलद गतीने भरू लागली आहे. यापूर्वी 5 लाख लिटरची टाकी भरण्यास 1 तास 20 मिनिटे लागत होती, आता ती केवळ 45 मिनिटांत भरते. यामुळे पाणीपुरवठ्याचे अंतर कमी होण्यास मदत होईल.
आळंदी नगरपरिषदेने दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळावे, अशी विनंती पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता श्रद्धा गर्जे यांनी केली आहे.
नागरिकांना आवाहन: नवीन लाईनमुळे पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम होत असून, गढूळपणाची समस्या लवकरच पूर्णपणे दूर होईल, असे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.