कासेवाडी, (ता. आष्टी, जि. बीड): श्री. संत वामनभाऊ महाराज आणि श्री. संत भगवान बाबा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने कासेवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भक्तिमय वातावरणात सुरू आहे. या साप्ताहच्या आध्यात्मिक सोहळ्याच्या चौथ्या दिवशी, आज रविवार, दि. २५ मे २०२५ रोजी, आळंदी येथील प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. प्राचार्य पांडुरंग महाराज मिसाळ यांचे भक्तिरसपूर्ण कीर्तन रात्री ९ ते ११ वाजता होणार आहे. त्यांच्या कीर्तनातील ज्ञान, भक्ति आणि सहजसुंदर शैलीमुळे भक्तांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
ह.भ.प. पांडुरंग महाराज मिसाळ हे आळंदी येथील वारकरी संप्रदायातील नावाजलेले कीर्तनकार आहेत. त्यांचे कीर्तन भक्ती, ज्ञान आणि सामाजिक प्रबोधन यांचा सुंदर संगम घडवणारे असते. ह.भ.प. महंत विठ्ठल महाराज शास्त्री (गहिनीनाथ गड) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ह.भ.प. भगवान महाराज डोंगरे यांच्या व्यासपीठ नेतृत्वाखाली हा सोहळा संपन्न होत आहे. या सप्ताहात बेलगांव, आष्टी, नवलवाडी, कन्हेवाडी, करंजी, कन्डेबडगांव, पांढरी, हाजीपूर, ब्रम्हगांव, पांगुळगव्हाण, मुगगांव, बनबेवाडी, आंबेवाडी, सोलेवाडी, चिंचपूर, शेकापूर, देसूर येथील भक्तांसह नवसारेताई भजनी मंडळ, थेटे बापू भजनी मंडळ (चोभा निमगांव) आणि कापशी भजनी मंडळ सहभागी होत आहेत.
साप्ताहतील कीर्तनकार
गुरुवार, दि. 22 मे : ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज भवर (शेषनारायण वारकरी संस्थान, देसूर)
शुक्रवारी, दि. 23 मे : ह.भ.प. महंत काशिनाथ महाराज (श्री. क्षेत्र गणेशगड संस्थान, नागतळा)
शनिवार, दि. 24 मे: ह.भ.प. राम महाराज शास्त्री (आळंदी)
रविवारी, दि. 25 मे: ह.भ.प. पांडुरंग महाराज मिसाळ (आळंदी)
सोमवार, दि. 26 मे : ह.भ.प. आजिनाथ महाराज लाड (आळंदी)
मंगळवार, दि. 27 मे: ह.भ.प. स्नेहाताई महाराज भोसले (बोहर, जि. सातारा)
बुधवार, दि. 28 मे: ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर गड)
काल्याचे कीर्तन –
गुरुवार, दि. २९ मे रोजी सकाळी १० ते १२ वाजता ह.भ.प. महंत विठ्ठल महाराज शास्त्री (गहिनीनाथ गड) यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात येईल आणि या आध्यात्मिक सोहळ्याची सांगता होईल.
गायक वादक
या सोहळ्यात गायनाचार्य म्हणून ह.भ.प. प्रकाश महाराज नागरे, ह.भ.प. विष्णू महाराज कापसे, ह.भ.प. देविदास महाराज बर्डे आणि अक्षय गर्जे, तर मृदुंगाचार्य म्हणून ह.भ.प. बाळकृष्ण महाराज सहभागी होत आहेत. काकडा भजनासाठी ह.भ.प. भगवान महाराज डोंगरे आणि ह.भ.प. देवराव महाराज फुंदे यांचे योगदान आहे.आयोजकांचे आवाहनकासेवाडी येथील समस्त गावकरी मंडळींनी सर्व भक्तांना ह.भ.प. पांडुरंग महाराज मिसाळ यांच्या आजच्या कीर्तनासह संपूर्ण सप्ताहातील कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन केले आहे.