पुणे : आषाढी पालखी सोहळा सुरक्षित, अपघातमुक्त, स्वच्छ आणि हरित पद्धतीने संपन्न व्हावा यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपायुक्त विजय मुळीक यांच्यासह पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संत तुकाराम महाराज पालखीचे 18 जून तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच 19 जून रोजी प्रस्थान होणार आहे. 20 आणि 21 जून चा मुक्काम पुण्यात असणार आहे. 6जुलैला आषाढी एकादशी आहे.
सूक्ष्म नियोजनावर भर:
डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले की, मानाच्या पालख्यांच्या विश्वस्तांशी बैठक घेऊन त्यांच्या सूचनांनुसार कार्यवाही करावी. वारीदरम्यान अन्न शुद्धतेची खात्री करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आणि भेसळ करणाऱ्यांविरुद्ध व्यापक मोहीम राबवावी. पालखी मार्गाचा संयुक्त दौरा करून सर्व विभागांनी समन्वय ठेवावा. अनुभवी अधिकाऱ्यांची सेवा घेण्यासाठी संबंधितांना विनंती करावी आणि राज्यस्तरीय बैठकीपूर्वी सर्व तयारी पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन:
पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी, स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी आणि चंद्रभागा तसेच नीरा नदी परिसराची स्वच्छता राखावी, असे आयुक्तांनी सूचित केले. पालखी पुढे गेल्यावर मागील गावात तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी. वारकऱ्यांना पुरेशा आरोग्य सुविधा, रुग्णवाहिकांमध्ये औषधे आणि वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्था:
पालखी मार्ग खड्डेमुक्त ठेवण्यासह उत्तम वाहतूक व्यवस्थापनाची काळजी घ्यावी. घाट परिसरात दरड कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. पालखी मार्गावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवावा आणि तिन्ही जिल्ह्यांतील व्यवस्थेची एकत्रित पुस्तिका तयार करावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
सोलापूरची तयारी:
सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पालखी सोहळ्यासाठी २५,५०० अधिकारी-कर्मचारी आणि १,८६० स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती दिली. पाणी, वीज, आरोग्य, गॅस सिलिंडर, स्वच्छता यांसारख्या सुविधांचे नियोजन केले जात आहे. महिलांसाठी विशेष व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन आराखडा आणि गर्दी व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराची चाचणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि साताऱ्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनीही आपापल्या जिल्ह्यांतील तयारीचा आढावा सादर केला.
दरम्यान, आषाढी पालखी सोहळा यशस्वी आणि सुरक्षित व्हावा यासाठी विभागीय आयुक्तांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले. स्वच्छता, हरितता आणि वारकऱ्यांच्या सुविधांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचनांमुळे यंदाची वारी अधिक व्यवस्थित होण्याची अपेक्षा आहे.