Monday

28-07-2025 Vol 19

आळंदीत भक्तनिवासासाठी 25 कोटींचा निधी देणार ; माऊलींच्या 750व्या जन्मोत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

आळंदी वार्ता : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आळंदी येथे इंद्रायणी तीरावर दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले. इंद्रायणी ची आरती केली. हजारो भाविकांनी हरिनाम गजरात रथोत्सव आणि दीपोत्सवात सहभाग घेतला.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “या सप्तशतकोत्तर सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. आळंदी ही ज्ञानभूमी आहे, जी पुन्हा पुन्हा प्रत्येकाला बोलावते. आळंदी म्हणजे आनंद देणारे स्थान आहे.” त्यांनी ज्ञानेश्वरीमुळे गीतेतील तत्त्वज्ञान मराठीत सर्वसामान्यांना उपलब्ध झाल्याचे सांगितले. “मी पहिला मुख्यमंत्री असेल, ज्याला या सोहळ्यास उपस्थित राहता आले. शेतकरी आणि वारकरी म्हणून मला माऊलींच्या आदर्शांचा अभिमान आहे,” असे त्यांनी नमूद केले.

इंद्रायणी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे काम करेल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. “एसटीपीची कामे सुरू झाली असून, इंद्रायणी स्वच्छ आणि शुद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. भक्तनिवासासाठी नगरविकास विभागामार्फत २५ कोटींचा निधी आणि ज्ञानभूमी आराखड्यासाठी प्रयत्न करू,” असे आश्वासन त्यांनी दिले.

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे यांनी पाकिस्तान समर्थित दहशतवादावर कठोर टीका केली. “पाक धार्जिण्या दहशतवाद्यांनी निरपराध भारतीयांवर हल्ले केले, पण पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ‘सिंदूर ऑपरेशन’द्वारे चोख प्रत्युत्तर दिले. हा नवा भारत आहे. दहशतवाद्यांनी भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये. गोळीला मिसाइलने उत्तर देण्याची ताकद आपल्या जवानांमध्ये आहे,” असे ते म्हणाले. पाकिस्तानने माकडचाळे थांबवावेत, अन्यथा भारतीय लष्कर त्यांचे नामोनिशान मिटवेल, असा इशाराही त्यांनी दिला. अफवांवर विश्वास न ठेवता सरकारच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सोहळ्यात शिंदे यांच्या हस्ते इंद्रायणी मातेची आरती करण्यात आली. युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माऊलींकडे देशाच्या रक्षणासाठी आणि नागरिकांच्या सुख-समाधानासाठी प्रार्थना केली. “राज्य आणि देशावर कोणतेही संकट येऊ नये, यासाठी सैन्य, पोलीस आणि सर्व विभाग सतर्क आहेत,” असे त्यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात हा महोत्सव उत्साहात साजरा होत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. “मानवता, सेवाभाव आणि योगसाधनेचे महत्त्व ज्ञानेश्वरीने सांगितले आहे. माऊलींच्या आदर्शांवर आपण सर्वजण चालत आहोत,” असे त्यांनी नमूद केले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उत्तम जाणकार, विजय शिवतारे, मंदिर कमिटी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ऍड राजेंद्र उमाप, भावार्थ देखणे, चैतन्य महाराज कबीरबुवा, ऍड रोहिणी पवार, पुरुषोत्तम दादा महाराज, आळंदीकर ग्रामस्थ माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, डीडी भोसले पाटील, संजय महाराज घुंडरे, अक्षय महाराज भोसले, शहराध्यक्ष राहुल चव्हाण यांसह हजारो भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते.

alandivarta