Thursday

31-07-2025 Vol 19

“पांडुरंगमय जीवन: संत तुकाराम महाराजांची एकनिष्ठ भक्ती”

आणिक दुसरें मज नाहीं आतां |
नेमिलें या चित्तापासूनियां ||१||
पांडुरंग ध्यानीं पांडुरंग मनीं |
जागृतीं स्वप्नी पांडुरंग ||२||
पडिलें वळण इंद्रियां सकळा |
भाव तो निराळा नाही दुजा||३||
तुका म्हणे नेत्रीं केली ओळखणं |

तटस्थ हें ध्यान विटेवरी ||४||

अर्थ– चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग हा महान भागवत भक्त, विश्ववंदनीय, संत सम्राट, संत श्रेष्ठ, विश्ववंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी आपली भगवंताविषयी, पांडुरंगाविषयी असणारी श्रद्धा, भावना, एकनिष्ठा या ठिकाणी सांगितलेली आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनाला फक्त एकच रंग लागलेला होता, तो रंग म्हणजे पांडुरंग होय. त्याशिवाय त्यांच्या चित्ताला, जीवनाला कोणत्याही रंगाने स्पर्श केलेला नव्हता. पांडुरंग बद्दल त्यांची नितांत श्रद्धा होती, विशेष आवड होती. त्यांच्या मनाला दुसऱ्या कोणत्याही देवतेच्या श्रेष्ठत्वाने स्पर्श केलेला नव्हता.

रात्रंदिवस त्यांच्या ध्यानी-मनी एकच पांडुरंग होता. त्यांचे जीवन हे पांडुरंगमय झालेले होते. त्यांच्या जीवनात कोणताही गुण-दोष राहिलेला नव्हता. त्यांना संपूर्ण विश्वच देवमय झालेले दिसत होते. त्यांना जागृती आणि स्वप्नामध्ये सुद्धा पांडुरंग दिसत होता. पांडुरंगाच्या भक्तीचे त्यांच्या सर्व इंद्रियांना वळण पडलेले होते. सगळीच इंद्रिय त्यांचे पांडुरंगाच्या भक्तीत समरस झालेली होती. यापेक्षा त्यांच्या मनात कोणताही वेगळा भाव नव्हता. आपल्या दोन्ही डोळ्यांनी त्यांनी पांडुरंगाचे रूप अवलोकिले होते. त्यामुळे ते त्यांच्या दृष्टीत, नेत्रात, डोळ्यात, मनोभावे सामावलेले होते. तटस्थ ध्यान कोणते होते. जे पंढरपुरामध्ये विटेवर उभे आहे. विशेष म्हणजे ते तटस्थ स्वरूपातली आहे. म्हणून तर पंढरपुरामध्ये राहणारा पांडुरंग परमात्मा सखा वाटत होता. पण त्यांचे मन पांडुरंगी रंगले होते व गोविंदाने त्यांचे मन वेधले होते. मोहित केली होते.

तुकाराम महाराजांच्या अंतरंग भक्तीचे लक्षण यामधून दिसून येते. तुकाराम महाराजांची धारणा किती उच्च प्रतीची होती हे दिसून येते. पांडुरंगावर किती दृढ विश्वास होता याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. म्हणून साधक, संत, उपासक भक्त यांची ईश्वराबद्दलची ध्येय, निष्ठा, धारणा कशी असावी त्याचा हा एक आदर्श भक्तीचा परिपाठ आहे.

-प्रा. डॉ. पांडुरंग महाराज मिसाळ

alandivarta