आळंदी वार्ता: आळंदी-पुणे रस्त्यावरील देहू फाटा चौकात अनेक वर्षांपासून वाहतुकीला अडथळा ठरत असलेले महावितरणचे (MSEB) विद्युत पोल आळंदी नगरपरिषदेच्या पुढाकाराने यशस्वीपणे हटवण्यात आले आहेत. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सातत्याने या ठिकाणी भेटी देऊन शिफ्टिंगचे नियोजन केल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. यामुळे आळंदी-पुणे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे.
देहू फाटा चौकातील विद्युत पोलमुळे वाहनचालकांना गेल्या अनेक वर्षांपासून अडचणींचा सामना करावा लागत होता. येथील वाहतुकीची कोंडी अधिक गंभीर बनत होती. या समस्येच्या निराकरणासाठी आळंदी नगरपरिषदेने महावितरणशी समन्वय साधून पोल शिफ्टिंगचे नियोजन केले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि कार्यक्षम प्रशासनामुळे आषाढी वारीपूर्वीच हे पोल हटवण्यात आले. या कामामुळे वाहतुकीतील अडथळे दूर होऊन प्रवाशांचा त्रास कमी होणार आहे.
आळंदी नगरपरिषदेच्या या प्रयत्नांचे स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि व्यापारी वर्गाने स्वागत केले आहे. “वाहतुकीची कोंडी कमी होऊन प्रवास सुलभ होईल,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली. नगरपरिषद प्रशासनाचे आणि मुख्याधिकारी खांडेकर यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. यामुळे आळंदीला येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिकांना मोठा दिलासा मिळेल.