Saturday

02-08-2025 Vol 19

आळंदीत माती कला विकास चर्चासत्राचे आयोजन; देशभरातील तज्ञ मांडणार विचार

आळंदी वार्ता: अखिल भारतीय प्रजापती कुंभकार महासंघ (रजि. दिल्ली) यांच्या माती कला विकास सेलच्या वतीने सोमवार, दि. २६ मे रोजी सकाळी ९:३० ते दुपारी १:३० या वेळेत आळंदी येथील माणिकचंद मुंबई फ्रुटवाला धर्मशाळा (श्री संत गोरोबा काका मंदिरासमोर) येथे माती कला विकास या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात देशभरातील माती कलेतील तज्ञ आणि कुंभार कारागीर आपले अनुभव आणि विचार मांडणार आहेत.

या चर्चासत्रात मिट्टीकूल (वाकानेर, गुजरात) चे संस्थापक श्री मनसुखभाई प्रजापती, महात्मा गांधी ग्रामीण विकास संस्था (भारत सरकार) चे वरिष्ठ संशोधक डॉ. शशि प्रकाश मिश्रा, कन्याकुमारीचे कुंभार उद्योग तज्ञ आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी डॉ. भगवती शरण, राजस्थानचे प्रख्यात मूर्तीकार ओमप्रकाश गालन, खुर्जा (उत्तर प्रदेश) येथील १०,००० हून अधिक कुंभारी वस्तू बनवणारे ब्रिजेश प्रजापती, कन्नूर (कर्नाटक) येथील पाच लाखांहून अधिक मातीचे गणपती बनवणारे सुरेश कुंभार, खानापूर (राजस्थान) येथील मातीच्या दागिन्यांचे तज्ञ सौ. दीपा सोनजी, तसेच कोकण आणि विदर्भातील २० फूट उंचीच्या मूर्ती बनवणारे मूर्तीकार आणि जिगर जॉलीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर कुंभार कला जोपासणारे उद्यमशील तरुण उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रजापती भूषण पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या कर्तृत्ववान विट उद्योजकांचे विचार ऐकण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.

माती कला सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता कुंभार यांनी समस्त कुंभार कारागिरांना या चर्चासत्रात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक कुंभार समाज आणि कारागिरांनी या संधीचा लाभ घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

alandivarta