आळंदी वार्ता : आळंदीत पोटच्या मुलांनी ७५ वर्षीय वडिलांना बेवारस सोडल्याची हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. निवृत्ती शिवराम गायकवाड असे या वृद्ध आजोबांचे नाव असून, त्यांना विविध आजारांनी ग्रासले आहे आणि त्यांची दृष्टीही कमकुवत झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मुलांच्या कृत्याविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
निवृत्ती गायकवाड हे मूळचे पुण्यातील आंबेगाव येथील रहिवासी आहेत. ते आपल्या कुटुंबासोबत तिथेच राहत होते. मात्र, त्यांच्या तीन अपत्यांनी, ज्यात मुलगीसह दोन मुलांचा समावेश आहे, त्यांना आळंदीत बेवारस सोडले. “मुलगी बापाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते, असे म्हणतात; पण येथे अपत्यांना आपल्या वडिलांचा विसर पडला,” असा सवाल उपस्थित होत आहे. आळंदीतील एका रुग्णालयासमोर बेवारस अवस्थेत आढळलेल्या निवृत्ती यांना अविरत फाउंडेशनचे निसार सय्यद यांनी आधार दिला. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर ही धक्कादायक माहिती पुढे आली.
“मुलांनी आधार दिला नाही”
निवृत्ती यांनी आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलांना वाढवले, शिक्षण दिले. मात्र, त्याच मुलांनी त्यांना वृद्धापकाळात एकटे सोडल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. सध्याच्या काळात आई-वडिलांना ओझे समजण्याची प्रवृत्ती वाढत असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. “उतारवयात आई-वडिलांना मुलांचा आधार हवा असतो, पण अशा घटना समाजाला कलंकित करणाऱ्या आहेत,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
अविरत फाउंडेशनचा पुढाकार
आळंदीतील अविरत फाउंडेशन ही संस्था बेवारस व्यक्ती आणि पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत आहे. निवृत्ती गायकवाड यांना रुग्णालयासमोर आढळल्यानंतर संस्थेने त्यांच्यावर प्रथमोपचार केले आणि आळंदी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्यांना मातोश्री वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले. निसार सय्यद म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून ते आळंदीत फिरत होते. दोन दिवसांपूर्वी पावसामुळे ते रुग्णालयाजवळ झोपलेले आढळले. माझे सहकारी निलेश वाबळे यांनी माहिती दिल्यानंतर त्यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितले की, मुलांनी त्यांना आळंदीत सोडले. त्यांच्या मूळ गावी आणि राहत्या पत्त्यावर चौकशी केली, पण अद्याप माहिती मिळाली नाही. सध्या त्यांना मातोश्री वृद्धाश्रमात दाखल केले आहे. या कामी सहकार्य करणाऱ्या ओमकार आवाड, अक्षय किर्वे, धनंजय घुंडरे आणि मातोश्री वृद्धाश्रमाचे मी आभार मानतो.”
“मुलांनो, तो वाट पाहतोय…”
ही घटना समाजाला अंतर्मुख करणारी आहे. निवृत्ती यांच्यासारख्या वृद्धांना आधाराची गरज असताना त्यांच्याच मुलांनी त्यांना वाऱ्यावर सोडणे, हे सामाजिक मूल्यांविरुद्ध आहे. अविरत फाउंडेशनने या प्रकरणी पुढाकार घेतला असला, तरी समाजानेही अशा घटनांविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे, असे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले.