Sunday

03-08-2025 Vol 19

माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी मानाच्या अश्वांचे अंकलीहून प्रस्थान; ३१५ किलोमीटरचा ११ दिवसांचा पायी प्रवास

आळंदी वार्ता: कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या आषाढी पायी वारीसाठी कर्नाटकातील अंकली येथून मानाचे अश्व हिरा आणि मोती रविवारी (दि. ८ जून) आळंदीकडे मार्गस्थ झाले. ३१५ किलोमीटरचा ११ दिवसांचा पायी प्रवास करून हे अश्व १८ जून रोजी आळंदीत पोहोचणार असून, माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी परंपरेनुसार सेवा रुजू करतील.अंकली येथील शितोळे सरकारांच्या राजवाड्यात सकाळी १० वाजता विधिवत पूजन, आरती आणि जरीपटक्याचे समर्पण झाले. मानकरी तुकाराम कोळी यांच्याकडे जरीपटका सोपवण्यात आला. अंबाबाई मातेच्या मंदिरात पूजनानंतर हिरा व मोती या अश्वांसह वाहनांचे पूजन करण्यात आले. यानंतर ग्रामस्थ, भाविक आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीत अश्व दिंडीसह आळंदीकडे मार्गस्थ झाले.

११ दिवसांचा प्रवास आणि मुक्काम

श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांनी सांगितले की, आषाढी वारीचे हे १९३ वे वर्ष आहे. पहिल्या दिवशी अश्वांचा मुक्काम मिरज येथे, तर पुढील टप्प्यांमध्ये सांगलवाडी (९ जून), इस्लामपूर पेटनाका (१० जून), वहागाव (११ जून), भरतगाव (१२ जून), भुईंज (१३ जून), सारोळा (१४ जून), शिंदेवाडी (१५ जून), पुणे (१६ व १७ जून) आणि १८ जून रोजी आळंदी येथे मुक्काम होईल. दररोज सुमारे ३० किलोमीटरचा टप्पा पूर्ण करून सायंकाळी नियोजित ठिकाणी मुक्काम होईल.

परंपरेचा मान
वारीदरम्यान दुपारच्या मुक्कामी माऊलींना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. हा मान शितोळे सरकारांकडे असून, यासाठी लागणाऱ्या साहित्याचा ट्रॅक्टरही आज अंकलीतून निघाला आहे. पालखीसोबत असणाऱ्या दोन अश्वांपैकी एक स्वाराचा आणि दुसरा माऊलींचा आहे. स्वार तुकाराम कोळी गेल्या २७ वर्षांपासून वयाच्या १५व्या वर्षापासून वारीत सहभागी आहेत. तीन उभ्या आणि चार गोल रिंगणात त्यांचे कौशल्य भाविकांना आकर्षित करते.

अश्व प्रस्थान पूर्वी अंकली येथील शितोळे सरकारांच्या राजवाड्यात अश्वांचे विधिवत पूजन आणि परंपरागत धार्मिक पूजा विधी पार पडले. याप्रसंगी श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार, महादजीराजे शितोळे सरकार, युवराज विहानराजे शितोळे सरकार, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, मानकरी योगीराज कुऱ्हाडे, योगेश आरु, ज्ञानेश्वर गुळुंजकर, अजित मधवे, शंकरराव कुऱ्हाडे यांच्यासह वारकरी उपस्थित होते. पूजा विधीनंतर अश्वांनी नगर प्रदक्षिणा करत आळंदीकडे प्रस्थान केले.

सन १८३२ पासून सुरू झालेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात शितोळे सरकारांचे अश्व आणि रात्री मुक्कामाच्या ठिकाणी देवासाठी तंबू देण्याची परंपरा अखंडितपणे सुरू आहे. या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाची तयारी जोरात सुरू असून, यंदाही लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होण्यास उत्सुक आहेत. 20 आणि 21 जुनचा मुक्काम पुणे शहरात असणार आहे. 5 जुलैला पालखी सोहळा पंढरपूरात पोहोचेल. 6 जुलैला आषाढी एकादशी आहे.

alandivarta