आळंदी वार्ता: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथाला जुंपण्यात येणाऱ्या मानाच्या बैलजोडींची अलंकापुरीनगरीत भव्य मिरवणूक उत्साहात पार पडली. यंदा बैलजोडीची सेवा अर्जुन घुंडरे, सचिन घुंडरे, विवेक घुंडरे आणि जनार्दन घुंडरे यांच्या कुटुंबाला मिळाली. मिरवणुकीनंतर महाद्वार चौकात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते बैलजोडीचे पूजन झाले.
गोपाळपुरातील स्वामींच्या मठाजवळ गांधी कुटुंबीयांनी बैलजोडीचे पूजन केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांनीही विधिवत पूजन केले. राजा-प्रधान, आमदार-मल्हार, सावकार-संग्राम आणि माऊली-शंभू अशा चार खिलारी बैलजोडींची मिरवणूक हरिनाम जयघोष, ढोलताशांचा दणदणाट आणि फटाक्यांच्या आतषबाजीने थाटात पार पडली.
यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, ॲड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड. रोहिणी पवार, ज्ञानेश्वर वीर, बबनराव कुऱ्हाडे, राहुल चिताळकर, विलासराव घुंडरे, रामचंद्र भोसले, नंदकुमार कुऱ्हाडे, संजय घुंडरे, अशोक कांबळे, अजित वडगावकर, सागर भोसले, योगीराज कुऱ्हाडे, सुनील रानवडे, ॲड. माधवी निगडे, तुकाराम माने, योगेश आरु, माऊली दिघे, सुदीप गरूड, माऊली गुळुंजकर, शंकरराव कुऱ्हाडे, पै. शिवाजीराव रानवडे, भिमाजी घुंडरे, अजित मधवें यांच्यासह आळंदीतील नागरिक आणि आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
मिरवणुकीसाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, दिघी-आळंदी वाहतूक पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेत वाहतूक सुरळीत ठेवली. घुंडरे कुटुंबाने लाखो रुपये खर्चून चार भारदस्त बैलजोडी विकत घेतल्या असून, पर्यायी जोडीही तयार ठेवली आहे.
यंदा प्रथमच चार बैलजोडींची मिरवणूक झाली. देवस्थानने पालखी रथाची दुरुस्ती आणि ट्रॅक्टरद्वारे चाचणी सुरू केली असून, आता बैलजोडी जुंपून चाचणी होणार आहे.