Saturday

02-08-2025 Vol 19

भर पावसात माऊलींच्या पालखी रथाची चाचणी

आळंदी वार्ता : येत्या १९ जून रोजी आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आज, २६ मे रोजी माऊलींच्या रथाची सराव चाचणी घेण्यात आली. सकाळी आळंदी शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. शहरातील रस्त्यांवर पाणी वाहत असताना ग्रामस्थ आणि देवस्थान कर्मचाऱ्यांनी रथ ओढून चाचणी पूर्ण केली. आषाढी एकादशी 6 जुलै रोजी आहे.

रथाची सराव चाचणी भक्त निवास ते साई मंगल कार्यालय आणि साई मंगल कार्यालय ते भक्त निवास या मार्गावर घेण्यात आली. काही ठिकाणी रथाला ट्रॅक्टर जोडून, तर काही ठिकाणी ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांनी स्वत: रथ ओढून चाचणी केली. या सोहळ्याच्या तयारीचा भाग म्हणून रथाची डागडुजी पूर्ण करून त्याची चाचणी घेण्यात आली, जेणेकरून प्रस्थान सोहळ्यात कोणतीही अडचण येऊ नये.

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनानेही तयारी सुरू केली असून, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

alandivarta