आळंदी वार्ता: श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यात पालखी रथाला जुपल्या जाणाऱ्या बैलजोडीचा मान यंदा घुंडरे कुटुंबाला मिळाला आहे. अर्जुन मारुती घुंडरे, विवेक ज्ञानेश्वर घुंडरे, जनार्दन घुंडरे आणि सचिन बाळासाहेब घुंडरे यांना हा सन्मान प्राप्त झाला असून, या निवडीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. बैलजोडीचे पूजन सोमवार, २ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर महाद्वार, श्री क्षेत्र आळंदी येथे होणार आहे.
या सोहळ्याचे पूजन महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण आणि अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या शुभहस्ते संपन्न होईल. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि समस्त आळंदी ग्रामस्थांनी सर्व वारकऱ्यांना आणि भाविकांना या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
बैलजोडीची खरेदी आणि तयारी –
घुंडरे कुटुंबाने पालखी रथासाठी चार बैलजोड्या खरेदी केल्या आहेत. विवेक घुंडरे यांनी सातारा, बावधन येथून ‘राजा’ आणि ‘प्रधान’ ही बैलजोडी बाळासाहेब कदम यांच्याकडून, तर हिंजवडी येथून ‘सावकार’ आणि ‘संग्राम’ ही जोडी उमेश साखरे यांच्याकडून खरेदी केली. अर्जुनराव मारुती घुंडरे आणि सचिन बाळासाहेब घुंडरे यांनी नांदेड सिटी येथून ‘मल्हार’ आणि ‘आमदार’ ही बैलजोडी निखिल कोरडे यांच्याकडून, तसेच उत्तम नगर येथून ‘माऊली’ आणि ‘शंभू’ ही जोडी मुरलीधर नाणेकर यांच्याकडून खरेदी केली.
या बैलांना शेती मशागत आणि बैलगाडी ओढण्याचा सराव दिला जात असून, त्यांना शाळूची वैरण, हिरवा चारा, पेंड, खारीक-खोबऱ्याचा भुगा आणि बैल खाद्य मिक्स असा पौष्टिक आहार दिला जात आहे. बैल मानकरींनी सांगितले की, २ जून रोजी पूजन आणि मिरवणूक होणार असून, आळंदीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
दरम्यान, श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा १९ जून २०२५ रोजी आळंदीतून प्रस्थान करेल. २० आणि २१ जून रोजी पालखीचा मुक्काम पुणे येथे असेल, तर ६ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होईल.