Wednesday

30-07-2025 Vol 19

Ashadhi Wari 2025: दिंडी अनुदान योजनेचे वारकऱ्यांकडून स्वागत; प्रत्येक दिंडीला मिळणार २० हजार रुपये

आळंदी वार्ता : भाजप व शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, राज्य शासनाने वारीतील दिंड्यांसाठी अनुदानाबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा शासन आदेशही अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. या शासन निर्णयाचे राज्यातील वारकरी – फडकरी दिंडी समाजाने स्वागत केले आहे.

गतवर्षी राज्यातील दहा मानाच्या पालखी सोहळ्यातील नोंदणीकृत दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये अनुदान देण्याची योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांच्या मागणीनुसार केली होती. त्यानुसार राज्यातील संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत निळोबाराय, संत चांगावटेश्वर व माता रुक्मिणी या मानाच्या १० पालख्यांसोबतच्या १ हजार १०९ दिंड्यांना प्रती दिंडी २० हजार रुपये इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या यादी प्रमाणे देण्यात आले होते.

यावर्षी देखील दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण २ कोटी २१ लाख ८० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे बैठक घेऊन पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांना उत्तम सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी देखील आवश्यक सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे. प्रशासनातर्फे व्यापक स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याने दिंडीतील वारकऱ्यांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहेत. शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे वारकरी फडकरी दिंडी समाजाने स्वागत केले आहे.

या निर्णयानंतर शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी मौजे दरे (सातारा) येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार व्यक्त केले.

“साहेबांनी दिलेला शब्द पाळला. निर्णय घेतला आणि शासन आदेशही त्वरीत निघाला. त्यांनी स्वतः अशा प्रकारे निधी देण्याचा पायंडा पाडला. वारकऱ्यांच्या सेवेसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरेल. वारकऱ्यांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा” हे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे ब्रीद वाक्य त्यांनी कृतीतून पुन्हा सिद्ध केले आहे. ” असे मत शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी यावेळी व्यक्त केले.

या निर्णयामुळे वारीचे नियोजन अधिक सुसह्य, सुसंगत आणि व्यवस्थित होईल. भाजप अध्यात्मिक आघाडी , शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना, सर्व वारकरी बांधव आणि संप्रदायाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

alandivarta