Monday

28-07-2025 Vol 19

श्री ज्ञानेश्वर विद्यालयात अजित वडगांवकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासह कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा संपन्न

आळंदी वार्ता: श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांच्या ६०व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आळंदीतील श्री ज्ञानेश्वर विद्यालय, ज्युनियर कॉलेज, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर आणि श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षण कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या प्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सुरेशकाका वडगांवकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक विजय गुळवे, पत्रकार अनिल जोगदंड, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

भावनिक प्रास्ताविक आणि सन्मान –

प्रास्ताविकात डॉ. दीपक पाटील यांनी अजित वडगांवकर यांच्याशी असलेल्या मैत्रीच्या अतूट नात्याचा उल्लेख करत बालपण, कॉलेज जीवन, क्रिकेटच्या मैदानावरील आठवणी आणि संस्थेत एकत्र काम करतानाच्या प्रसंगांना उजाळा दिला. वाढदिवसानिमित्त शाळेतील महिला कर्मचाऱ्यांनी औक्षण केले, तर सर्वांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आणि शाळेच्या वतीने अजित वडगांवकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि माऊलींची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.

प्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांनी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने वडगांवकर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक शनिवारी ‘दप्तरविना शाळा’ या उपक्रमांतर्गत बहुभाषिक ज्ञान असणारे विद्यार्थी घडविण्याचा मनोदय व्यक्त केला. पत्रकार अनिल जोगदंड यांनी पंचक्रोशीतील पत्रकारांच्या वतीने शुभेच्छा देत शाळेच्या उपक्रमांना भविष्यातही प्रसिद्धी देण्याचे आश्वासन दिले.

अजित वडगांवकर यांचे मनोगत –

अजित वडगांवकर यांनी सर्वांचे आभार मानले आणि मनोगत व्यक्त करताना सांगितले, “संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या शुभेच्छांमुळे मला कार्याची ऊर्जा मिळते.” त्यांनी सचिव म्हणून संस्थेत केलेल्या सुधारणा, भौतिक सुविधा आणि शाळेची प्रगती यांचा आढावा घेतला. तसेच, नुकत्याच संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवातील संस्थेच्या उल्लेखनीय सहभागाची माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष सुरेशकाका वडगांवकर यांनी मुलगा अजित वडगांवकर यांना शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि भविष्यातही असेच योगदान अपेक्षित असल्याचे सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा –
कार्यक्रमानंतर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकुर्डी यांच्या ‘Society for Data Science’ उपक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेचा शैक्षणिक क्षेत्रात वापर कसा करावा, यावर कार्यशाळा घेण्यात आली. यात श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा माजी विद्यार्थी कुमार पार्थ शिंदे यांनी ‘Copilot with MS-Office’ आणि AI चा शिक्षणातील वापर यावर मार्गदर्शन केले. कुमारी दिव्या कार्तिकेयन यांनी ‘META-AI’, कुमारी स्नेहा वर्पे यांनी ‘Google Studio & Chat-GPT’, कुमार श्रीरंग वैद्य यांनी ‘Veed-AI’, कुमार ऋषिकेश जाधव यांनी ‘Quizizz’ आणि कुमार प्रतीक पडोळे यांनी ‘Videography’ यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत शाळेतील आणि पंचक्रोशीतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र शेखरे यांनी केले, तर आभार प्रदीप काळे यांनी मानले. पसायदानाने या उत्साहपूर्ण सोहळ्याची सांगता झाली.

alandivarta