Sunday

27-07-2025 Vol 19

श्री ज्ञानेश्वर विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तक वाटप व १००% उपस्थिती सन्मान सोहळा संपन्न

आळंदी वार्ता: दीर्घ सुट्टीनंतर नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात श्री ज्ञानेश्वर विद्यालयात झाली. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप, गतवर्षी १००% उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान, तसेच श्रीराम मंदिर विश्वस्तपदी निवड झालेल्या विश्वस्तांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

शाळेच्या प्रांगणात सनईच्या सुमधुर स्वरांनी, फूल-पाकळ्यांच्या उधळणीसह ढोल आणि बँडच्या निनादात दिमाखदार वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेचा परिसर रांगोळी, फुले, रंगीबेरंगी फुगे आणि आकर्षक फलकांनी सजवण्यात आला होता. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. भाऊसाहेब मोडेकर, प्रमुख पाहुणे मनशक्ती केंद्र (लोणावळा) चे अजित फफाळे, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, आळंदी शिवसेनेचे शहराध्यक्ष राहुल चव्हाण, अविनाश गुळुंजकर, चारुदत्त प्रसादे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, सुरेश घुंडरे, पत्रकार महादेव पाखरे, अनिल जोगदंड, दादासाहेब कारंडे, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचा शुभारंभ आणि प्रास्ताविक-


अजित वडगावकर यांनी प्रास्ताविकात पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, १५ वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम यशस्वी ठरला आहे. सुरुवातीला नगण्य संख्येने १००% उपस्थित राहणारे विद्यार्थी आता दरवर्षी वाढत आहेत. यावर्षी तब्बल ६९ विद्यार्थी वर्षभर एकदाही गैरहजर राहिले नाहीत, ज्यामुळे शाळेची गुणवत्ता वाढली आहे. त्यांनी नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी शाळेचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा दिल्या.

सन्मान आणि पाठ्यपुस्तक वाटप
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये १००% उपस्थिती असणाऱ्या ६९ विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि दप्तर देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच, शासनाच्या निर्णयानुसार पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. श्रीराम मंदिराच्या विश्वस्तपदी निवड झालेल्या अविनाश गुळुंजकर आणि चारुदत्त प्रसादे यांचा श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. राहुल चव्हाण, जे या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत, यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल कौतुक केले आणि सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. प्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेत आत्मविश्वासाने यश मिळवण्यासाठी प्रेरित केले. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करत शाळेच्या उपक्रमांचे, वातावरणाचे आणि १००% उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांचे, पालकांचे, शिक्षकांचे व संस्थेचे कौतुक केले.

अजित फफाळे यांनी प्र.के. अत्रेंच्या कवितेच्या ओळींमधून शाळेचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना अभ्यास, नियोजन, अपयश पचवण्याची क्षमता आणि चांगल्या विचारांची कृती जोडण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना दररोज आई-वडिलांना वंदन करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगतात ह.भ.प. भाऊसाहेब मोडेकर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रदीप काळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम नव्या शैक्षणिक वर्षाच्या उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी सुरुवातीचा साक्षीदार ठरला.

alandivarta